Thursday, September 8, 2016

वलयांकित

ओळखीचे चेहरे एकेदिवशी अचानक गायब झाले की आयुष्यात विरामचिन्हांचा पाऊस सुरू होतो. कधीकाळी कुठे दिसलेले, भेटलेले, गवसेलेले चेहरे अकस्मात निर्विकार होतात. आणि अनेक प्रश्न मागे ठेऊन जातात. त्या निरूत्तर प्रश्नचिन्हांचा अर्थ लावत बसण्यात मग त्या चेह-यांना जवळून पाहिलेले इतर चेहरे गढून जातात. अर्थ काही लागत नाही कारण त्या प्रश्नांची उत्तरं फक्त त्या निर्विकार चेह-याकडेच असते. गळफास आवळताना अडकलेल्या श्वासातून फेकले जाणारे प्रश्न चार भिंतींवर कोरले जातात. शरीरापासून वेगळं होण्याचा आत्म्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. आर्त-शांत किंकाळ्या आतल्या आत कोंडल्या जातात. आणि मग या संघर्षात त्या काळ्याकुट्ट मृत्यूचा विजय होतो. त्याचा तो तसा विजय व्हावा हीच त्या चेह-याची इच्छा असते. 

पुलाखालच्या त्या वलयांकित दुनियेतला काळ्या वर्णाचा तो चेहरा. काळीकुट्ट दाढी आणि त्यात लपलेलं ते मिश्किल हास्य. वलयं काढण्यासाठी येणा-या अनेक अनोळखी चेह-यांमधला हा एक ओळखीचा चेहरा. ओळख कशी झाली ठाऊक नाही. पण थोडासा वाचनवेडा. आवडलेलं लिखाण वाचून फोन करून प्रतिक्रिया देणारा. उगीचच उर्दूतून अलविदा करणारा. दाढीतून डोकावणा-या हास्यामागची दुनिया कधी त्याने कळू दिली नाही. चेहरा हसरा आहे त्यामुळे कुणी त्या दुनियेत शिरायचे कष्टही घेतले नाहीत. कधीमधी काही गोष्टी कानावर पडायच्या पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कदाचित तेव्हा ते द्यायला हवं होतं. पण प्रत्येक चेहरा वाचायचा नसतो. काही चेहरे हे फक्त चाळायचे असतात, पुस्तकांसारखे. हा चेहरा वाचायला हवा होता.

एक वलय अदृश्य झालं. विश्वनाथ, पक्या, जरासंध आणि आता हा कृष्णवर्णीय चेहरा. प्रत्येकाच्या कथा वेगळ्या, प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या. मोहरे ही वेगळे आणि त्यांचे चेहरे ही. प्रत्येकाचा सहवास वेगळा अन् प्रत्येकाचा प्रवास वेगळा. पण साम्य एकच आणि ते म्हणजे मागे ठेऊन गेलेले मूक प्रश्न. 

"खुदा हाफिज़, खुदा तुझे महफूज रखे " म्हणत तू त्या वलयांकित दुनियेतून काही काळासाठी निरोप घ्यायचास. आत्ताचा निरोप हा निरंतर काळासाठी घेतलास. ते ही न सांगता. "हम तो महफूज है भाई, लेकिन यह तहरीर पढने के लिए तुम अब मयस्सर नही|"

5 comments: