Sunday, September 11, 2016

एका संस्कृतीचं विसर्जन

आकाशातून पर्जन्यधारा कोसळत होत्या. त्या सरी जमिनीवर आपटून त्यातून एक विशिष्ट असा ध्वनी निर्माण होत होता. त्याच ध्वनीलहरींना कापत एका तालबद्ध ध्वनीची सुरूवात झाली. आणि हळूहळू त्या तालावर पाय थिरकायला लागले. गुलाल उधळत...गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी उठली आणि ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. ताशांनी वेग धरला आणि अंगावर रोमांच आणणा-या त्या गजरात भक्तगण न्हाऊ लागले. दुतर्फा काढलेल्या रांगोळीच्या मधोमध गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. पर्जन्यधारांमुळे भिजलेली ती रांगोळी जास्तच खुलून दिसत होती. फडफडणारा भगवा घेऊन ध्वजपथक रिंगण घालत होतं. मिरवणूक रंगात येऊ लागली होती. तडतडणारा ताशा आणि दुमदुमणारा ढोल मंडळींना बेभान करत होता. वर्षानुवर्षांची परंपराच होती ती. पथकातली मंडळीही जोशात होती. सारंकाही तालबद्ध, शिस्तबद्ध आणि लयबद्ध. विसर्जनाची मिरवणूक असावी तर अशी. डोळ्यांचं पारणं फेडणारी.

तितक्यात ढोल-ताशांना फिका पाडत धरतीला हादरे देत एक आवाज आसंमतात घुमू लागला. मंडळींनी माना आवाजाच्या दिशेने वळवल्या. गणपतीच्या मुर्तीपेक्षाही उंच रचलेल्या स्पीकर्सचं दर्शन झालं आणि एकच जल्लोष झाला. पावलं स्पीकर्स रचलेल्या राशी घेऊन येणा-या ट्रककडे वळायला लागली. गाण्यांच्या तालावर शरीरं हालायला लागली. चित्रविचित्र अंगविक्षेप दिसायला लागले. ट्रकभोवतालची गर्दी वाढली तसा डीजेनं आवाजही वाढवला. त्या आवाजात ढोलाचा घुमारा अन् ताशाची तरी लुप्त झाली. ध्वजपथकाच्या फडकणा-या झेंड्याचा दिमाख उतरला. इतकावेळ मिरवणुकीला बांधून ठेवणारी ती शिस्तबद्धता, लय कुठच्या कुठे पळाली. रांगोळीतला रंग उडून गेला. मिरवणुकीचा साज हरपला. ढोल-ताशा पथकातला जीवच निघून गेला. अस्ताव्यस्त झालेल्या त्या मिरवणुकीने त्याच अवस्थेत मुर्तीचं विसर्जन केलं. संस्कृतीचं विसर्जन त्या वळलेल्या पावलांनी आधीच करून टाकलं होतं.

1 comment: