Tuesday, January 5, 2016

मुलखावेगळा

जांभळाच्या झाडाखालच्या अंगणातून हाका आल्या की पोरं जमायची. आणि नंतर मग नुसता धुडगूस सुरू असायचा. चपला कुठेतरी पडलेल्या असायच्या. गोंगाटाने अंगण भरून जायचं. खेळूनखेळून पायही जांभळे व्हायचे. सूर्य कुठेतरी वरती दिसायचा. तो केव्हा गायब व्हायचा याचं भान नसायचं. चपलांच्या गर्दीतली एक चप्पल मात्र कायम उलटी असायची. ती कुणाची हे सगळ्यांना माहित असायचं. पण कधी कुणी ती सरळ केली नाही. मुळात ती सरळ केली तरी काही वेळाने उलटीच दिसायची. त्यामुळेच कालांतराने मग ती सरळ करायचा नाद पोरांनी सोडून दिला. पण उलट्या चपलेच्या मालकाचा नाद मात्र भारी. नियमांच्या चौकट्या मोडून तो खेळायचा. अगदी झोकून देऊन. खेळ कुठलाही असो, ह्याचे नियमच न्यारे. 

शाळेतही या मालकाचं वागणं त-हेवाईकच. याची टर उडव, त्याची खिल्ली उडव, सतत रूमाल चघळत राहा, हाता-पायावर गणितं लिही, प्रयोगशाळेत भलतेच प्रयोग कर असे याचे उद्योग सतत सुरू. त्यामुळे याला कुणी कधी फारसा जवळ केला नाही. शिक्षकांनीही सतत शिक्षाच केल्या. पण त्याची त्याला काहीच फिकीर नव्हती. ह्याचं रूमाल चघळणं सुरूच. मेंदू तल्लख होता त्यामुळे शाळेत पहिला आला. तसा पहिल्यापासूनच हुशार. आतला मेंदू मोठा आहे हे त्याच्या डोक्याच्या आकारावरून सहज ओळखू यायचं. हुशार माणसं विक्षिप्त असतात म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं.

शाळा सुटून तो कॉलेजात गेला तरीही चप्पल उलटीच राहिलेली. त्याला ती उलटीच राहायला हवी होती बहुतेक. जी गत शाळेत होती तीच कॉलेजमध्ये. मात्र त्याच्यासोबतची टाळकी आता बदललेली होती. त्यांना या उलट्या चपलेची ना माहिती होती ना कदर. त्यामुळे उलटी चप्पल हीच त्यांच्यासाठी विरंगुळा बनली. त्या मालकालाही भारी मजा वाटायची. तोही त्या आनंदात डुबक्या मारायचा. 

या डुबक्या मारत असतानाच त्याची जन्मदाती हे जग सोडून निघून गेली. तशी ती जाणार याची कल्पना होतीच. पण याने ते दुःख कधी कुणाला सांगितलं नाही. असाध्य रोग त्या जन्मदात्रीला पोखरत असताना हा सुद्धा आतून पोखरला जात होता. पण चेह-यावर, ओठावर कधी ते आलंच नाही. किंबहुना त्याने ते येऊ दिलं नाही. ज्यादिवशी त्या मातेने जगाचा निरोप घेतला तेव्हा हा मालक ढसाढसा रडत होता. एरवी तोंडात कोंबून ओला होणारा तो रूमाल यावेळी अश्रू शोषून घेत होता. सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही आघात झाला की त्याचं जीवन पार बदलून जातं म्हणतात. पण हा मुळातच असामान्य होता. चप्पल उलटीच ठेवायची हाच ह्याचा होरा कायम. 

आज इतक्या वर्षांनीही त्याची चप्पल उलटीच आहे. काही मासे हे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेनेच पोहत असतात. त्यांना मुळी प्रवाहात यायचंच नसतं. अशा माशांना कुणी बळजबरीने प्रवाहात आणलं की ते मासे भिरभिरतात, बिथरतात. त्याचं चित्त भुंग्याप्रमाणे अस्थिर होऊन जातं आणि मग ते संपूर्ण प्रवाहाच अस्थिर करून सोडतात. या माशांना समजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न इतर मासे करत असतात. अर्थात तो व्यर्थच असतो.

जांभळाच्या झाडाखाली अंगणात खेळताना अनेकदा आम्ही चपला विसरायचो. दुस-या दिवशी पुन्हा यायचंच आहे म्हणून त्या तशाच तिथे ठेवायचो. पण कधीतरी त्या अंगणातून निघताना आम्ही बालपणच त्या जांभळाखाली विसरलो. उलट्या चपलेचा मालक मात्र ते बालपण आजही खिशात घेऊन मिरवतोय आमच्याकडे कुत्सितपणे बघत.

4 comments: