Tuesday, July 7, 2015

पक्या वारला

पुलाखालचा पक्या वारला. बेवडा, वेडसर, अजागळ, हाफ पँटीतला, खुरटी दाढी वाढवलेला पक्या जग सोडून गेला, कायमचा. पुलाच्या खांबामध्ये दडवलेला त्याचा ऐवज आता पोरका झाला. मळलेली पिशवी, जीएमच्या रिकाम्या बाटल्या आणि कुणाला फारशी काही कल्पना नसलेला असा तो गूढ ऐवज अनाथ झाला. जितक्या शांतपणे पक्या फुक्यांच्या आयुष्यात आला तितक्याच शांतपणे, फारसा गाजावाजा न करता तो निघूनही गेला. 

एरवीही पक्या असाच निघून जायचा  पण ते काही काळासाठी गायब होणं असायचं. रहस्यमयरित्या गायब व्हायचा तो आणि तितक्याच गूढपणे पुन्हा अवतरायचाही. पण ते गूढच आता गायब झालंय. पुलाखालचा जरासंधही असाच नाहीसा झाला. त्याचा ठाव कुणालाच नाही. पुन्हा कधीतरी तो दिसेल अशी वेडी आशा कुठेतरी मनात अजूनही शिल्लक आहे. पण पक्याच्या बाबतीत तसं नाही. पक्या कुठे गेलाय हे आता कुणीही ठामपणे सांगू शकेल.

काही दिवसांनी पक्या विस्मृतीत जाईल. खरंतर लक्षात राहावा असा तो कधी नव्हताच. त्यामुळे कुणी त्याची फ्रेम करावी आणि जपून ठेवावी असंही नाही. तसंही कुठल्याही चौकटीत पक्या बसू शकत नव्हता. त्यामुळे फ्रेममध्येही फार काळ टिकणं अवघडच. 

आनंदाची गोष्ट एकच की आयुष्यभर अस्थिरपणे जगणारा पक्या अखेर स्थिर झाला. पुलाखाली वावरणारा पक्या पूल ओलांडून पलिकडे निघून गेला. 

टीप - जेवणाच्या पानातल्या चटणीसारखा होता पक्या.

( पक्या ऊर्फ प्रकाश वर्तक. सौजन्य - अभिमान आपटे )

4 comments:

 1. कमी शब्दात बरचं लिहलं आहे. लेखानाला खोली तर आहेच
  पण लांबीही पाहयला आवडेल

  ReplyDelete
 2. Khup Sundar lihilays... Chatka lagla vachtana..

  ReplyDelete
 3. भारतात नसल्यामुळे शानला येणं जाणं नाही म्हणून पक्याला विसरलो होतो. पण पाहिली ओळ वाचल्याबरोबर आठवला (पुलाखालचा पक्या, बेवडा). सही लिहिलं आहे.

  ReplyDelete
 4. Society t ek sadu yaycha to athvla

  ReplyDelete