Sunday, February 22, 2015

चटणी पिणारी माणसं

परवा एक माणूस दिसला हनुमान रोडवर. पेपरडिशमधली चटणी पीत होता. बशीतनं चहा प्यायल्यासारखा चटणी पीत होता. नाही म्हणजे प्यावी चटणी. काही म्हणणं नाही आपलं. पण भर रस्त्यात असं धाडस करणं खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे तमाम जनतेला फाट्यावर मारत त्याचं चटणीप्राशन सुरू होतं. हे कमी की काय म्हणून मग त्याने ती चटणी पिऊन झाल्यावर बोटाने पेपरडिश साफ केली. आणि मग बोटाला लागलेली उर्वरित चटणीचाही आस्वाद घेतला. सुसंस्कृत पार्लेकरांनी (ज्यांनी हे विहंगम दृश्य पाहिलं) स्वतःची बोटं तोंडात घातली असतील. असो. सांगायचा मुद्दा हा की त्या माणसाने चटणीवरही ताव मारला. भरलेल्या पोटापेक्षा त्या चटणीमुळेच बहुदा तो खरंतर तृप्त झाला असावा. त्या पेपरडिशने थोड्याफार प्रमाणात शोषून घेतलेल्या चटणीमुळे तो माणूस थोडा नाराजही होता. पण एकूणच चटणीवरचं त्याचं प्रेम ओसंडून वाहत होतं.

मागे पार्ल्याच्या रामकृष्णमध्ये हॉटेलमध्ये दोघा जणांनी सांबार पिण्याची शर्यत लावली होती. म्हणजे ते सांबार होतं फुकटच. पण त्याची चव अप्रतिम होती म्हणून त्यांनी तीन वाट्या ओरपल्या. शर्यत म्हणजे खरोखरीची शर्यत नाही. पण मुख्य जेवणापेक्षा सांबारावर जीव/भ जडल्यामुळे अधाशासारखे ते सांबार पीत होते. बाजूला उभा असलेला वेटर आत्मियतेने त्यांच्याकडे पाहत होता. सांबारावर खूश होऊन त्या दोघांनी बिलापेक्षा जास्त टीप दिली. 

मुद्दा खरंतर वेगळाच आहे. ताटात सतराशे साठ पदार्थ असले की चटणीकडे सहसा लक्ष जात नाही. पानातला लक्षवेधी पदार्थ म्हणून चटणीचं नाव घेतलं जात नाही. मुळातच चटणी हा प्रकार बनवतानाच कमी बनवला जातो. त्यामुळे पानातही त्याला पाव चमच्यापेक्षा जास्त जागा नसते. ताटातली चटणी संपली तरी कुणाला काही फारसा फरक पडतो अशातला भाग नाही. फार कमी लोक चटणी पुन्हा मागवून खातात. म्हणजे चटणीसाठी जेवण अडलंय असं होणं तर अशक्य. पंगतीतही कुणी आग्रहाने 'अहो चटणी घ्या' असा आग्रह करत नाही. उखाण्यालाही चटणी भरवली जात नाही. खास चटणी बनवणारा असा आचारीही नसतो. कॅटरिंगच्या कोर्समध्येही स्पेशलायझेनशला चटणी हा विषय जगात कुठे असेल असं वाटत नाही. चटणी बनवता येत नाही म्हणून कुणी नापास झाल्याचं ऐकिवात नाही, िकंवा लग्न न जुळल्याचंही ऐकिवात नाही तसंच लग्न मोडल्याचंही. मुळातच चटणी या पदार्थावर चर्चा करावी असंही कुणाला कधी वाटलं नाही. चटणीसारखा विषय महत्त्वाचा असू शकतो हेच मुळी लोकांना अजून पटलेलं नाही. त्यामुळे चटणीच्या मागण्या, आशा-आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होण्याचा प्रश्नच मिटला. 

पण चटणीला मात्र त्याचं काही नाही. म्हणजे कधीमधी दुःख होतं आणि चटणीलाही पाणी सुटतं. पण आपल्या असण्याने किंवा नसण्याने जगाचं काही अडत नाही ही भावना चटणीमध्ये वाटणासारखी भिनलेली असते. चटणी ना बंड करते ना स्वतःची चव बिघडवते. पाटा-वरवंट्याखाली, मिक्सरमध्ये स्वतःला वाटून घेत असते. आपल्या वाट्याला किती जागा येईल याची तमा न बाळगता पानामागून पानं वाढून घेत असते. कुठल्या पानात जाईल याचीही चिंता नसते. कधी पानात तशीच पडून राहते. कधी एका घासात संपते. तर कधी कुणासोबत तरी मिसळून जाते. 

फार अभावानेच चटणीच्या वाट्याला तिच्यावर अविरत प्रेम करणारी माणसं येतात. अशी माणसं आली की चटणी खूश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि ती त्यांच्याशी समरस होते. 

चटणी पिणा-या माणसांबद्दल मला नितांत आदर आहे.

(का कोण जाणे पण ताटाला आलेली चटणी आणि वाट्याला आलेली माणसं यांच्यात कुठेतरी, काहीतरी साम्य आहे.)