Saturday, June 7, 2014

भावनेचे दगड

"जी माणसं भावनाप्रधान असतात, त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनापैकी एक काहीतरी होतं. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुढतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. ह्याउलट काही माणसं चिडून उठतात. सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगूनही खरं वाटत नाही " - वपु.

विचार आणि भावना या दोन गुणांमुळे इतर जीवांपेक्षा माणसाचं स्वतःचं वेगळेपण सिद्ध होतं. आणि म्हणूनच सजीवांमध्ये हुशार असा हा जीव. याबाबत तरी निदान वाद नसावा. पण मुद्दा असा आहे की माणसाच्या या ज्या काही भावना आहेत त्या नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे दुखावल्या जातात? आणि त्यामुळे मग तो पशुसारखा का वागतो? वपुंनी जे काही म्हटलंय ते १०० टक्के खरं आहे. पण ते लिहिताना त्यांनी एक शब्दसंच वापरला आहे. तो म्हणजे "स्वाभिमानाला जबरदस्त धक्का." (वपुंचं वाक्यच का प्रमाण मानायचं वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत.)

आम्हाला शेकडो गोष्टींचे अभिमान आणि स्वाभिमान वगैरे आहेत. डझनभर दैवतं आमची. काही कधीच न अवतरलेली, तर काही गर्दीमुळेच अवतरलेली. त्यात लाडकी दैवतं, साहेबी दैवतं, राजेशाही दैवतं वगैरे वगैरे पोट-दैवतं. त्यांनी काही कर्तृत्वं गाजवलीही असतील. त्यांच्या त्या कर्तृत्वाबद्दल माहिती मिळवणं, त्यावर विचारविनिमय करणं, ते आत्मसात करणं वगैरे फंदात आम्ही पडत नाही. त्यांनी काहीतरी ज्याम भारी केलं ना म्हणजे ते थोर, बास! त्यांना जरा काही कुठे झालं की आमचं मानसिक संतुलन बिघडतं. रक्तच उसळतं आमचं. टकुरंच फिरतं. मेंदू, मन वगैरे सोडून दगड-धोंडे-तलवारी जवळ करतो आम्ही. ह्याला कापा, त्याला फोडा, अमक्याला पेटवा, तमक्याचा मुडदा पाडा. हे रक्ताचे पाट. च्यायला, भावनेशी खेळायचं नाही हां! भावना दुखावल्या की आम्ही काय वाट्टेल ते करतो.  कुणाचंच ऐकत नाही आम्ही. हां!

एवढ्या नाजूक आहेत हो का आमच्या भावना? की कोणीपण येतो आणि आमच्या दैवताला चार शिव्या घालतो, मणभर शेण फासतो, फोटो वेडावाकडा करतो आणि आम्ही लगेच पेटून उठतो. इतक्या कमजोर मनाचे आहोत आपण? काही बोलायचा अवकाश की दुखावली भावना. अरे? शाळेत मास्तर तमाम पोरांसमोर नाही नाही ते बोलून अपमान करायचे तेव्हा पण भावना दुखायच्या की. तेव्हा मारला होता का दगड?
आम्हाला बोललं तरी चालेल पण आमच्या महान दैवतांना काही बोलायचं नाही.
मान्य. महान आहेत ना ती? मग कुणीही चंटरपंटर बडबडलं तर त्याने काय घंट्याचा फरक पडणार त्या दैवताला? स्वतःचं रक्त उसळवून घेऊन काय फायदा? उगीचच हां काय!
काय तर म्हणे मुसलमान आम्हा हिंदूंना असं म्हणाला. नाही तर तो हिंदू आम्हा मुसलमानांबद्दल असं बरळला. झालं. चढाचढी सुरू तिच्यामायला! घाला ते चुलीत दोन्ही धर्म आणि बसा बोंबलत. दैवतं म्हणे. भावना दुखावल्या ह्यांच्या. घालून घ्या त्या भावना.

साधा प्रश्न आहे हो. एक फोटो पाहून भावना दुखावल्या जातात पण समोर घडणारा बलात्कार पाहून मात्र काही झाट होत नाही आमच्या भावनेला? काय म्हणायचं ह्याला? एका जीवंत जिवाच्या अब्रूचे निघणारे धिंडवडे पाहताना भावना कुठे जाऊन बसतात? नजरेसमोर कपडे फाडले जात असताना एक डोळे सोडून सगळं काही बंद होतं का? तेव्हा नाही का सापडत दगड, तलवारी, चाकू वगैरे? अजबच प्रकार म्हणायचा की हा. साला एक कोणतरी बडबड करणार आणि आम्ही माथी फिरवून घेणार. पण इथे डोळ्यासमोर चाललेला प्रकार आमच्या मेंदूला जरा सुद्धा धक्का लावणार नाही. तेव्हा दैवतं आठवणार नाहीत. धर्म तेव्हा सुचणार नाही. अहंकार तेव्हा उफाळून येणार नाही. काय कामाची मग ती दैवतं, ते धर्म? कशाला मानायचं त्यांना? आणि का साजरे करायचे ते उत्सव आणि जयंत्या? पेटवून द्या.

वपुंनी जे काही वर लिहिलंय ते वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. खूपवेळ विचार करा त्यावर (जमत असेल तर. नाहीतर आपले दगड आहेतच रस्त्यावर पडलेले) भावना काय असतात, त्या कशाशी खातात, त्या दुखावल्या जाणं म्हणजे काय, त्या तशी दुखावल्या गेल्या की काय करावं वगैरे बेसिक गोष्टी समजून घ्या. आणि मग ठरवा दगड मोठा करायचा की भावना.

No comments:

Post a Comment