Sunday, December 29, 2013

नाताळ बाबाची चिकनी चमेली

कुणाच्या धर्माबद्दल किंवा सणांच्या साजरीकरणाबद्दल आम्हाला एका अमीबाएवढाही आक्षेप नाही. काय वाट्टेल त्या पद्धतीने धुडगूस घाला - स्व-जबाबदारीवर. अहो सण आहे, त्यामुळे जरा धिंगाणा, मस्ती वगैरे होणारच. आता होळीला उद्या कुणी म्हणालं की "बाबांनो अंगाला रंग लावू नका. त्याऐवजी तिथे दोरीवर चार कपडे घातले आहेत त्यांनाच काय ते रंग फासा." तर चालेल काय? जमणारच नाही की नाही! त्यामुळे उगाच ध्वनिक्षेपकाचा आवाज अमूक इतक्याच डेसिबलमधे असावा, तमूक मीटर कापडच अंगावर असावं, हात-पाय विशिष्ट अंशातच वळले पाहिजेत, वगैरे गप्पा वायफळ. असो. मुद्दा कळला ना?

तर सध्या ख्रिसमसचा मूड अगदी आभाळाला जाऊन भिडलाय. काल तर कार्यालयात सुद्धा लोकं (लोक हा शुद्ध शब्द असला तरी लोकं म्हटल्यावर जे एक मानसिक समाधान लाभतं ते शुद्ध शब्दाने साधलं जात नाही.) नाताळ बाबाच्या टोप्या घालून आणि त्याच्या छोट्या प्रतिकृती समोर लावून कामं करत होते. त्यात आयटीवाल्याने आमच्या ज्ञानसागरात दोन-तीन थेंब टाकले. जिंगल-पँट नावाची एक नवीनच भानगड त्याने सोदाहरण समजावली.  काही कार्ट्यांनी तर काल संध्याकाळी पार्टीचा प्लानसुद्धा केला होता. पण आमच्या खत्रूड साहेबामुळे आम्हाला काही जाता आलं नाही. असो. (सांगायचा मुद्दा खरा वेगळा आहे. पण सदतीस शब्दांमध्ये मांडता येणा-या घटनेला साडेसातशे शब्दांचं फुटेज दिल्याशिवाय आत्मा शांत होत नाही.)

आमची राहती इमारत ज्या रस्त्यावर आहे तो हनुमान रोड पार्ल्यातला जरा ब-यापैकी प्रसिद्ध रस्ता आहे. म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्ग, विमानतळ, जुहू आणि पार्ले स्टेशन अशा अति-महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा रस्ता वगैरे आहे तो. तर तिथे दिवाळी, नाताळमध्ये दिव्यांची एकदम दणक्यात रोषणाई असते. ख्रिसमसला तर इतकी भन्नाट आणि भारी सजावट असते की "ख्रिस्ताचा जन्म याच रस्त्यावर झाला की काय?", असं एखाद्या नवख्याला वाटू शकेल. गेल्या काही वर्षांपासून तर इथे नाताळ बाबासुद्धा येतो. त्यामुळे चिल्लीपिल्ली, पोरंटोरंसुद्धा लई गर्दी करतात. गाणी काय लावतात, नाचतात काय.....नुसता धुडगूस असतो. रस्ता गर्दीने तुडुंब भरून जातो.

यंदा तर धमालच होती. संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास डीजेने "ब्राझील.....लालालालालालाला" सुरू केलं. मग थोडावळे इंग्रजी रूळावरून गाणी चालवली. मध्येच एकदम कुठूनतरी "नटरंग"ला आणून नाताळ बाबासमोर उभा केला. मग "कोंबडी पळाली"वर काही काळ दाढी कुरवाळली. असं करत करत "साडी के फॉल सा" पर्यंत मजल मारली. दीड-दोन तास त्याचा लाल-पांढरा ड्रेस हवेत वेड्यासारखे हात-पाय फिरवत होता. त्याच्या सोबत चिल्लीपिल्लीसुद्धा नाचत होती. आणि ह्या सगळ्याला "खंबा" आय मीन "खंदा" पाठिंबा द्यायला पालक जातीने हजर होते, काही तर सहभागीसुद्धा झाले. एकूणच माहौल ढिण्चॅक होता. रस्ता कसा अगदी जीवंत झाला होता. नाताळ बाबा आला म्हणून जनता खूष वगैरे होती.

पण या सगळ्यात लोच्या असा आहे की हा आमचा लोकल नाताळ बाबा शीला की जवानी, चिकनी चमेली आणि बदनाम मुन्नीचा दिवाणा आहे. अहो, त्या निरागस, निष्पाप लहानग्यांना तो असल्या गाण्यांवर नाचत चॉकलेट्स, गोळ्या वगैरे वाटतो हो. एरवी ह्या गाण्यांवर काही आक्षेप नाही हो. म्हणजे ज्या सुमार बुद्धिमत्तेतून ही गाणी उदयाला आली आहेत आणि ज्या तितक्याच समदर्जाच्या बुद्धिवंतांनी ही कलाकुसर उचलून धरली आहे, त्या दोहोंच्या मेंदूंची दहीहंडी बनवून फोडणंच, आत्म्याला शांतीदायी असणार आहे. तो मुद्दा वेगळा. पण अहो, चिमुरड्यांना अशा गाण्यांवर नाचायला लावून नाताळ साजरा करणं ख्रिस्ताला तरी पचेल काय? ह्या प्रकाराला नाताळ बाबांचे साजरीकरण म्हणायचं की पांढ-या शुभ्र दाढीला लागलेला म्हातारचळ?

बरं, आपण असं समजू की नाताळ बाबांची अक्कल वयापरत्वे शून्याच्या पा-याखाली गेली आहे. पण त्या चिमुरड्यांच्या पालकांनी काय त्यांचे मेंदू ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी दान केले आहेत का? या असल्या भुक्कड, भिकारड्या आणि "वजा ट" दर्जाच्या साजरीकरणामध्ये सहभागी व्हावंसं तरी कसं काय वाटतं देवजाणे.

असो. कुणी जात असताना तक्रारीचा सुरू लावू नये. उगीच वर्ष सरत असताना कटकट नको करायला. पण जे खटकलं ते कुणाला तरी सांगणं गरजेचं वाटलं हो. चालायचंच. नाताळ बाबाला जो काही धिंगाणा घालायचाय तो घालू द्यावा - स्वजबाबदारीवर. गीतकारांच्या सुमार बुद्धिमत्तेत थोडी सुधारणा व्हावी. तमाम पालकांनी ख्रिसमिस ट्रीच्या सजावटीसाठी दिलेले मेंदू परत घ्यावे आणि त्याचा योग्य वापर कसा करता येईल यावर जरा भर द्यावा. हीच काय ती येसूकाकांच्या चरणी प्रार्थना.

(संपलं एकदाचं. चला. चौथा ग्लास भरूया.)