Wednesday, August 21, 2013

रक्तरंजित पूर्णविराम

सत्याचा पारवा बाळगे असत्याचे पंख
त्यागाच्या ढेपीभोवती हव्यासाचे डंख

धर्माच्या पिंडीला अधर्माचा सुगंधी टिक्का
सुमनांच्या गुच्छावर कंटकांचा काळा शिक्का

शस्त्रधारी देह मिरवी शांतीचा बुरखा
सेवेच्या कार्याला भ्रष्ट झाला चरखा

चितेवरल्या मढ्याला खोट्या आसवांच्या झुंडी
सभा-सत्कारांना लवते भाड्याची मुंडी

पावित्र्याच्या मूर्तीला अपावित्र्याचा अभिषेक
श्रद्धेच्या थडग्यावर अंधश्रद्धेची चिखलफेक
.....

कुठे मत्सराची आग, कुठे संतापाचा भडका
कुणी माथेफिरू तुडवे कच्चा रस्ता उघडा-बोडका

नाण्या-नोटांच्या गाद्या सोन्याचांदीच्या लाद्या
वासनेच्या नखांनी ओरबाडल्या सा-या माद्या
......
गडद अंधार
झोंबरं गार
डोळे ज्वाळेची धार
जिव्हा झाली सटवी नार
माथी अंगा-याचा मार
हाती नंगी तलवार
करी त्वेषाने वार
हाडा-मांसाचे भार
....

भोळे-भाबडे-भेकड-हराम
मुक्तहस्ते एक रक्तरंजित पूर्णविराम
....


1 comment:

  1. पुष्कर खूप छान लिहलं आहेस. भावल मनाला. गुड. साहित्यिक मित्रा...

    ReplyDelete