Tuesday, August 13, 2013

काही"बाही"

घराबाहेर निघताना घालायचे कपडे....हा एक फार मोठा यक्षप्रश्न, आंघोळ संपत असताना, शेवटचा तांब्या खाली ठेवला की नेहमी पडतो. म्हणजे कपड्यांविषयी अनास्था वगैरे काही नाही हां. पण प्रश्न पडतो हे खरं. त्यात पुन्हा पूर्ण बाह्यांच्या शर्टांची आपल्याला अॅलर्जी. कपाट सुद्धा अशाच शर्टांनी व्यापलेलं. हात बांधून ठेवल्यासारखं वाटत राहतं त्या बाह्यांमध्ये. पण लोच्या असा असतो की जो शर्ट आवडतो तो नेमका तशाच बाह्यांचा असतो. अर्ध्यामध्ये काहीतरी भलतंच. आपण आपलं पूर्ण बाह्या दुमडून अर्ध्या केलेलं बरं. असो. विषयांतर फार होतं आजकाल.

मराठीमध्ये बरेच दिवसांत काही खरडलं नाही म्हणून म्हटलं की जरा बोटं मोकळी करूया. कळपाटावरून फिरायला लागली बोटं आणि स्क्रीनवर मराठी अक्षरं दिसू लागली की मन प्रसन्न होतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलेलंच आहे (काय ते, जाणकारांना माहितंच असेल.....आणि अजाणते असाल तर दुनिया पाहिली नाहीए अजून तुम्ही.)

कन्नडिगांच्या प्रांतात मराठी ऐकू-वाचू येण्याचा योग दुर्मिळच. (अगदी काही फार दुर्मिळसुद्धा नाही.) पण खोलीत बसलं की बाजूच्या घरातून कन्नड भाषेतला टीव्ही ऐकू येऊ लागला की जाणवतं. बाकी टीव्हीची भाषा सगळीकडे सारखीच. असो. पुन्हा विषयांतर. कचेरीपासून घर अगदी चार इमारती सोडून आहे. त्यामुळे सकाळी उठलं की अर्ध्या तासात कचेरीत. समजा कधी गरम पाणी नाही मिळालं सकाळी तर तसंच जायचं. दुपारी घरी यायचं, आंघोळ करायची आणि पुन्हा कामावर. त्रास नाही आयुष्यात. (.. हे दोन बिंदू पूर्णविराम नसून, लोकांची नजर लागू नये म्हणून टिके लावले आहेत.) रूम पार्टनरसुद्धा आपला नांदेडचाच असल्यामुळे आणखीच चांगलं. (. पुन्हा एक टिका)

कचेरीत कामसुद्धा मस्त. गोष्टी वगैरे लिहायच्या. शाळेच्या मुलांसाठी काहीतरी भन्नाट प्रयोग वगैरे करायचे. त्यामुळे प्रयोगाच्या साहित्याने दोन टेबलं भरलेली. आज म्हटलं की ही दोन्ही टेबलं साफ करू आणि गोष्टी नीट कपाटात ठेऊ. त्यामुळे दोन-तीन तास खपून काम पार पाडलं. सारखं खाली वाकून कमरेचे हाल झाले. त्यात पुन्हा वरच्या खिशात ठेवलेली खोलीची चावीसुद्धा सारखी बाहेर येऊन घर जवळच असल्याची आठवण करून देत होती. पण त्याकडे फार लक्ष न देता काम सुरू ठेवलं. सगळा कार्यभाग आटपून जेवून वगैरे म्हटलं की चला खोलीवर जाऊ. वरच्या खिशाला हात लावला तर एक च्युइंग गम आणि एक नाणं लागलं. चावीने खिसा सोडला होता. खपलोच की. गेली कुठे ही.

लगेच माघारी फिरलो आणि कचेरीत जाऊन कपाट उघडून भराभर पिशव्या उघडू लागलो. वाकून सामान भरताना अनेकदा दर्शन दिलेली चावी एखाद्या पिशवीत तर नाही ना दान झाली म्हणून पंधरा-वीस पिशव्या आणि एक मोठा खोका उघडून पाहिला. काहीच नाही. एरवी न बघता भरली जाणारी कच-याची पेटी सुद्धा डोळे सताड उघडे ठेऊन रिकामी केली. सगळा कचरा बाहेर काढून पुन्हा नीट, व्यवस्थित तपासून कोंबला. चावीचा नामोनिशाण नाही. जेवायला गेलो होतो, त्या जागी जाऊन पाहिलं. तर तिथे सुद्धा संपलेली पानंच होती. खिसा चाचपून पाहिला. शर्टाच्या आत नाही ना पडली म्हणून शर्ट झटकला, जीन्सच्या फोल्डमधली धूळ-माती साफ केली. पण चावी अदृश्यच होती.


मोठ्या साहेबाबरोबर एक मीटिंग संपवून जागेवर बसणार इतक्यात आठवलं की आपण खिळ्यांचा डबाच नाही तपासला. पुन्हा शोधमोहीम सुरू. पण चावीने तगडा सामना द्यायचं ठरवलंच होतं. संपूर्ण दुपार चावीच्या शोधात गेली. सहकर्मचा-यांनासुद्धा जरा बदल म्हणून शोधकामात सहभागी करून घेतलं. पण कुणाच्याच प्रयत्नांती परमेश्वर येईना. संध्याकाळ व्हायला लागली तशी मग रूम पार्टनरला फोन केला. त्याची कचेरीही घरापासून दोन मेट्रो स्टेशन्स सोडूनच होती. त्याला सगळं सांगितलं आणि म्हटलं की येतो तुझ्या कचेरीजवळ. तो शूर इसम तर थेटच म्हणाला की फोड की कुलूप, माझ्याकडे दुसरं आहे. म्हणजे ह्याच्याकडे दुसरं कुलूप आहे म्हणून हे फोडायचं. चावटपणाच आहे हा. लोकांची डोकीसुद्धा ना......असो. विषयांतर नको.


तर इंदिरानगर (जिथे आमचा तंबू टाकलाय सध्या) स्टेशनला मेट्रोमध्ये बसलो. एक स्टेशन मागे गेल्यानंतर हाताची घडी घालून खिडकीबाहेर बघायला लागलो तर उजव्या हाताला डाव्या बाहीकडे काहीतरी लागलं. चमकून, दुमडलेल्या बाहीत बोटं घालून चाचपून पाहिलं तर चावी प्रगट झाली.


पूर्ण बाह्यांच्या शर्टांची अॅलर्जी म्हणतात ती ही. लोक ह्याला वेंधळा वगैरे समानार्थी शब्द वापरतील. हरकत नाही. वापरू द्या. पण ही अॅलर्जीच आहे.

1 comment:

  1. (.) ek tika mazyatarphe!! drushta lagu naye nhanun :P

    ReplyDelete