Friday, January 25, 2013

पक्या, सोहनलाल आणि जरासंध

पूर्वेला पश्चिमेशी जोडणारा हा पूल. पुलावर वाहनांची वर्दळ तर पुलाखाली धुराची. पुलाचं नाव काहीही असलं तरी जवळच असणा-या एका पडक्या थिएटरच्या नावाने ती जागा प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतले तमाम फुके त्या पुलाखालच्या पानवाल्याकडे आपली धुरंधर इच्छा पूर्ण करायला येतात. पानवाल्याच्या बाजूलाच एक हॉटेल होतं, ज्याचं आता लॉटरी केंद्रात रूपांतर झालंय. केंद्राबाहेरच चहाची एक टपरी. या सगळ्या संसाराला लागूनच आणखी एक पानवाला. पूर्वेकडेच पुलाच्या दुस-या बाजूला पार्लेजी बिस्किट फॅक्टरी. स्टेशनकडून येणारा रस्ता उजव्या हाताला पानवाल्याला ठेऊन फॅक्टरीसमोरून उजवीकडे वळून पुढे अंधेरीच्या दिशेने जातो. पानवाल्याकडे पाठ करून उभं राहिलं की समोर फॅक्टरी आणि डाव्या हाताला रस्ता ओलांडून हनुमानाचं मंदिर.

पुलाच्या बरोबर खाली एक लाकडी बाकडं टाकलेलं. बाकडं म्हणजे तीन-चार लाकडी खोके जोडून त्यावर एक फळी बसवलेली. त्या बाकड्याच्या बाजूलाच नेहमी एक रिक्शा लागलेली असते त्यामुळे त्या बाकड्याला वेगळी प्रायव्हसी मिळालेली. बाकड्याच्या बाजूला असणार-या पुलाच्या खांबाला मच्छरदाणी बांधलेली. बाकड्याखाली एक जुनाट आणि ब-याच ठिकाणी कुस्करलेली प्लास्टिकची बाटली. बाकड्यावरच काही मळकी कापडं आणि एक चादर. ही जागा आणि सामग्री जरासंधाची. जरासंध हे काही त्या इसमाचं खरं नाव नाही. फुक्यांनी त्याला बहाल केलेली ती एक पदवी कम नाव. शरीर म्हणजे दारूचं जीवंत गोदाम. दिवसातला सर्वाधिक वेळ हा नशेतच. कुणीही येऊन त्याला बदडून जातं. बदडतं म्हणजे अक्षरशः चोपतं. वेड्यासारखं कुटतं. तरीसुद्धा हा मरत नाही आणि सुधरतही नाही. फुक्यांची अशी धारणा आहे की उद्या याला मधून कापला तरी तो पुन्हा जोडला जाईल (थोडा वेळ लागेल पण होईल.) म्हणून त्याचं नाव जरासंध. ह्याचं म्हणे एक चांगलं घर आहे. भाऊ का कुणीतरी अमेरिकेत आहे. जरासंधाची बायको त्याच्यासाठी रोज डबा आणते. हा खातो आणि त्या बाकड्यावर झोपतो. लोक येऊन ह्याला का मारतात याचा कुणालाच ठाव नाही. हा नित्यनेमाने मार खातो. कुणावरही उलटा हात उचलत नाही. बायकोच्या हातचं जेवण आणि लोकांच्या हातचा मार याने त्याचं पोट भरतं. बरं, ह्याला कुणी मारायला आलं तर फुक्यांपैकीही कुणी मध्येही पडत नाही. धुराच्या ढगांमध्ये याचं चित्रीकरण होतं तेवढंच काय ते.

जी कथा जरासंधाची तशीच काहीशी पक्याची. पक्याला सगळेजण पक्याच म्हणतात. त्याचंही खरं नाव कुणाला माहित नाही. पक्या थोडा वेडसर आहे, म्हणजे खरोखरच तो मानसिक रुग्ण आहे. उंच, किडकिड्या, खुरटी दाढी वाढलेली, डोक्यावरचे अर्धे केस गायब झालेले आणि बहुतांशवेळा अर्ध्या चड्डीतच दृष्टीला पडणारी ही वल्ली. पानवाला, चहावाला यांचा पक्या हा नेहमीचा गि-हाईक. गि-हाईक म्हणजे ग्राहक नाही, तर चेष्टामस्करी करण्यासाठी असलेली हक्काची सोय. जरासंधाप्रमाणेच पक्याही अट्टल दारूडा. पण पक्याचा जीवाभावाचा मित्र कुणी असेल तर तो म्हणजे सोहनलाल. सोहनलाल हे पक्याच्या कुत्र्याचं नाव. त्याच्याही नावाची कथा कुणाला माहित नाही. सोहनलाल आणि पक्याचं नातं घट्ट आहे. एखादवेळेस पक्या पुलाखाली दिसणार नाही पण सोहनलाल त्या जागेशी एकनिष्ठ आहे. पक्या कुठूनतरी येतो आणि पहुडलेल्या सोहनलाल प्रेमाने चापटी किंवा हातातला प्लास्टिकचा कॅन मारतो. सोहनलाल दचकून उठला की हा त्याला लाडात येऊन विचारतो की, "कौन मारा तेरे को?....आं?...कौन मारा?"
सोहनलाल ही एक वेगळी कथा आहे. समस्त कुत्रे परिवाराला लाजवेल असा क्रमांक एकचा आळशीपणा ह्याच्यात ठासून भरला आहे. दिवसातल्या कुठल्याही वेळी हा पहुडलेला किंवा आळस देतानाच्या स्थितीमध्येच दिसणार. सोहनलाल ही म्हणे "सुख सेवा समिती" आहे. (जाणकारांना ही संकल्पना माहितच असेल पण नवशिक्यांसाठी म्हणून सांगतो. सुख सेवा समिती म्हणजे असा सजीव ज्याचे एकपेक्षा अधिक (कमीत कमी पाच) विरूद्ध लिंगी सजीवांशी खूप जवळचे संबंध आहेत.) यामुळेच की काय पक्या आणि फुक्यांसाठी सोहनलाल आदरस्थानी आहे. त्याचा हेवा करणारेही आहेत पण तेही सोहनलालला मानतात. असो.

केव्हाही त्या ठिकाणी गेलं की पक्या आणि जरासंधाचे नवनवीन किस्से कळतात. मागच्या आठवड्यातली गोष्ट. बाकड्याशेजारी नेहमी रिक्शा लावणारा रिक्शावाला त्याची रिक्शा लावून उतरला आणि बाकड्यावर पहुडलेल्या जरासंधाला चोपायला लागला. व्यवस्थित चोप सुरू होता. जरासंध रिक्शावाल्याचे हात झेलत बाकड्यावरून पडला. तंगड्या वर करून हात हवेत उडवत मार खात होता. दहा मिनिटं बदडल्यानंतर रिक्शावाला निघून गेला. जरासंध पुढली पाच मिनिटं त्याच अवस्थेत पडलेला होता. जमिनीवरून उठून बाकड्यावर पूर्वस्थितीत यायला त्याला थोडा वेळ लागला. मूळ पदावर आल्यानंतर पुन्हा बाकड्यावर पसरला आणि झोपून गेला. फुक्यांनी हे सगळं नेहमीप्रमाणे चहाच्या घोटांबरोबर जिरवलं.

पक्याही गेल्याच आठवड्यात कुणाकडून तरी मार खाऊन आला होता. जरासंधाच्या कुटण्यामागचं कारण कळत नसलं तरी पक्याचं मात्र तसं नाही. पक्या मार ओढवून घेतो. म्हणजे कृतीच अशी करतो की समोरच्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. पुलाखाली मागे एकदा लोखंडी खांब ठेवला होता. पक्या जोर लावून तो उचलायचा प्रयत्न करत होता. त्याला तसा बघून तीन-चार फुकेही मदतीला धावले. सगळ्यांनी तो खांब उचलला आणि रस्त्याच्या मध्यापर्यंत गेले तोच पक्या म्हणाला, "नही नही....ये ऊधरही अच्छा लग रहा था| वापस रखो|" झालं. त्या तीन-चार फुक्यांनी बदडला. पक्याचा एक गुण वाखाणण्याजोगा आहे. तो कधी कुणाकडे भीक मागत नाही. आजूबाजूच्या लोकांच्या गाड्या पुसतो, केरकचरा काढतो, चार पैसे कमावतो आणि त्याची दारू पितो. मागे एकदा जवळच्याच कुठल्यातरी इमारतीमध्ये गटार साफ करण्यासाठी पक्याला बोलावलं. पक्याने कुठूनतरी दोन टाळकी मिळवली आणि तिकडीने बरीच खटपट केली. पुलाखाली गेलो तेव्हा पक्या मार खाऊन शिव्या घालत आला. तेव्हा कळलं की ह्याने ती इष्ट इमारत सोडून भलत्याच तीन-चार इमारतींची गटारं साफ केली होती.

काल मात्र पक्याचं काहीतरी बिनसलं होतं. कुणीतरी हात साफ केले होते त्याच्यावर. फुक्यांपैकी एक जण त्याला घेऊन आला तेव्हा पक्या शिव्या घालत होता. दारूची नशी उतरली नव्हती किंवा मग नुकतीच चढली असावी. पानवाल्यासमोर पक्या जमिनीवर फतकल मारून बसला. शिव्यांचं च-हाट सुरूच होतं. "बोटल सर पे मारूंगा...फोड डालूंगा|" वगैरे डायलॉग्ज मारत असतानाच त्याच्या हाताला पेप्सीची काचेची िरकामी बाटली लागली. फुक्यांना वाटलं की आता पक्या खरोखरच ही बाटली फोडणार. पक्याने ती बाटली अलगद जमिनीवर आपटली....आपटलीपेक्षा वाजवली. काहीच झालं नाही. पुन्हा वाजवली. पुन्हा काहीच नाही. आणखी एकदा वाजवली. पुन्हा तेच. वैतागून ती बाटली बाजूला फेकली आणि कुठेतरी गायब झाला. फुक्यांचा विरंगुळा झाला.

नेहमीप्रमाणे आज संध्याकाळी पुलाखाली गेलो. जरासंधाचं बाकडं विखुरलेलं होतं. तो कुठेच आसपास नव्हता. मागाहून कळलं की अनधिकृत बांधकामांवरच्या कारवाईत याचं बाकडं गेलं. प्लास्टिकची बाटली, मच्छरदाणी, मळकी कापडं...कशाचाच नामोनिशाण नव्हतं. फळी बाजूला पडलेली होती. रिकामे, लाकडी खोके वाकडे तिकडे झाले होते. त्या नजा-याकडे बघत असतानाच सोहनलाल आला आणि मागाहून पक्या. सोहनलाल इकडे-तिकडे पाय वर करून बाजूलाच लावलेल्या एका गाडीच्या टपावर जाऊन बसला. पक्याने त्या विखुरलेल्या बाकड्याकडे पाहिलं. दोन मिनिटं तो टक लावून बघत होता. मागे वळून एकदा सोहनलालकडे पाहिलं, मिष्किल हास्य केलं आणि निघून गेला. 

अधिकृतपणाच्या चौकटीत अडकलेल्या जगात अनधिकृतपणे जगू पाहणा-या तीन जीवांच्या जगण्यावर पक्या कदाचित मनोमन हसला असेल. धुरांच्या ढगांमध्ये याचंही चित्रीकरण झालं.

Thursday, January 10, 2013

एक झुंज पालीशी

(ही ताजी आणि सत्य घटना आहे.)

खरंतर ही अत्यंत साधी घटना आहे तसं बघायला गेलं तर. पण एका रात्रीच्या झोपेचं खोबरं झाल्यामुळे हा सगळा प्रपंच. साधारण अडीच-तीनच्या सुमारास काही कारणामुळे प्रसाधनगृहाकडे जावं लागलं. तर तिथल्या दारावर पाल नावाचा चतुष्पाद सरपटणारा प्राणी आढळला. एरवी चिरकूट, मरतुकडा दिसणा-या या जीवाला अपवाद अशी ही धष्टपुष्ट पाल होती. चांगल्या खातेपिते घरची असल्याचे सगळे पुरावे होते. घरी एकटाच असल्यामुळे एक हॉल सोडला तर बाकीच्या सगळ्या खोल्यांमधल्या खिडक्या बंद होत्या. अशा परिस्थितीत हा जीव उपटला कुठून याचा विचार पटकन येऊन गेला. मुळातच पालीविषयी अनास्था आणि चीड असल्यामुळे बेगॉन (ते फक्त डास मारण्यासाठी होतं हे नंतर कळलं) घेऊन फवारणी सुरू केली. तर ती पाल दारावरून भर्रकन सरपटत कपाटाखाली गेली. कपाटाखाली असंख्य गोष्टींचा साठा असल्यामुळे शोध मोहीम हाती घेणं अशक्य होतं. एका हातात काठी आणि दुस-या हातात बेगॉन असे रौद्ररूप धारण करून कपाटाखाली डोकावून बघितलं. पण काही नजरेत येत नव्हतं. मग नुसतीच फवारणी करून इथे-तिथे काठी आपटली. फवारणीचा अतिरेक झाल्यानंतर प्रसाधनगृहातील काम उरकून हॉलमधल्या मूळ जागेवर येऊन बसलो. टीव्हीवरचा सिनेमा बघत असतानाच प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आला. आवाज येताच पालीने हालचाल केल्याचं ताडलं आणि पुन्हा रौद्र रूप धारण करून कपाटाकडे धावलो. तिच्या हालचालीची नुसतीच चाहूल लागत होती पण दर्शन काही होत नव्हते. पुन्यांदा अंदाधुंद फवारणी आणि काठीचा आपटी बार वाजवला. ती कुठून तरी बाहेर येईल म्हणून थोडावेळ शांतपणे उभा राहिलो. पण काकूंचा मूड नव्हता बहुतेक. त्यामुळे पुनश्च मूळ जागी आलो.

एवढ्या सगळ्या खटाटोपानंतर तो चतुष्पाद सरपटी प्राणी संपुष्टात आला असावा अशी समजूत करून निश्चिंत झालो होतो. टीव्हीवरचा सिनेमा एव्हाना पुढे सरकला होता. घड्याळाचे काटेही एव्हाना पुढे सरकले होते. सोफ्यावर बसून टीव्हीच्या साक्षीने थोडं काम करत बसलो. दहा-पंधरा मिनिटं झाली असतील तोच पुन्हा आवाज आला. शांततेचा भंग पावल्याने तळपायाची आग मस्तकात गेली. हा जीव मरतही नाही आणि त्याच्यापेक्षा वरचढ अशा दुस-या जीवाला निवांत बसूही देत नाही, या विचाराने चीडचीड झाली. पण यावेळी मात्र जरा दबकून आणि तिला चाहूल लागू न देता जायचं ठरवलं. हॉलमधूनच किचनमध्ये डोकावलं तर तिने जागा बदलली होती. कपाटाखालून बाहेर येऊन ती कपाटावर चढत होती. फवारणीचा परिणाम आणि कपाचाला असणारा सनमायका म्हणून की काय, चढता चढता ती वरून खाली पडली. च्यायला, माणूस कुठूनही पडला तरी त्याला थोडीशी का होईना पण दुखापत होते. ही ब्याद मात्र दुखापतग्रस्त व्हायला तयारच नव्हती. नुसतीच खातेपिते घरातील नसून व्यायामशाळा वगैरेही नियमितपणे करत असली पाहिजे. असो. तर खाली पडल्यावर ती निस्तब्धपणे बसून होती. मी हॉलच्या खालीतून हे सगळं बघत होतो. यावेळी रौद्र रूप थोडं मॉडिफॉय करून काठीऐवजी चप्पल हातात घेऊन हळूहळू तिच्या दिशेने सरकू लागलो. तशी तिने पटकन पल्टी मारून उलट्या दिशेने बेडरूममध्ये पलायन केलं. पटापट किचन, पॅसेज आणि बेडरूमचे दिवे लावत तिच्या मागे मागे गेलो.

बेडरूममध्ये शिरताच तिने थेट खिडकीच्या दिशेने सरपटायला सुरूवात केली. पण अचानक मार्गात बदल करत तिने ड्रेसिंग टेबलचा रस्ता धरला. ती टेबलाच्या खाली जाईल या विचाराने पटकन हॉलमधून काठी घेऊन आलो. आता मात्र तिला मारण्याऐवजी घरातून हुसकून लावण्याचा विचार माझ्या मनात आला. पण बेडरूमची खिडकी बंद होती आणि वाट पालीने अडवली होती. मी ती काय करते हे बघण्यासाठी तिच्याकडे टक लावून बघत होतो. ती काहीच हालचाल करत नव्हती. कदाचित माझ्या हालचालींवरून ती पुढचे डावपेच आखणार होती. आमच्यापैकी कुणीच बधत नव्हतं. शेवटी पुरूष या नात्याने मी पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि हळूहळू पुढे जाऊ लागलो. तशी ती भर्रकन ड्रेसिंग टेबलच्या खाली शिरली. ड्रेसिंग टेबलाच्या आजूबाजूचा परिसरही अनेक जिन्नसांचा साठा करून होता. त्यामुळे शोधमोहीमेमध्ये पुन्हा अडचण आली. पण हळूहळू एक एक करत गोष्टी बाजूला करू लागलो. एका हाताने काठीचा आवाज आणि दुस-या हाताने फवारणी करत तिला मोकळी वाट करून देत होतो. ड्रेसिंग टेबलच्या वर असणा-या दोरीवर वाळत घातलेले कपडे होते. त्यात एक साडीच असल्यामुळे मोठा परिसर झाकला जात होता. ती दोरीवरून काढून टाकली. इतर दोन-तीन कपडेही बाजूला केले. पुन्हा काठी-आपटी-बार आणि फवारणी केली. जरा मागे हटलो. का कोण जाणे पण, ड्रेसिंग टेबलच्या वर सहज नजर टाकली तर खोलीच्या त्या कोप-यातून ती माझी फजिती बघत होती. मी तिच्या दिशेने जोरात फवारणी केली. या हल्ल्याने ती पुन्हा एकदा वरून खाली पडली आणि क्षणाचाही विलंब न करता ड्रेसिंग टेबलच्या मागे घुसली. पुन्यांदा आपटीबार आणि फवारणी केल्यामुळे असेल कदाचित पण ती ड्रेसिंग टेबलच्या बाहेर येऊन खिडकीकडच्या भिंतीवर ग्रीलच्या खाली आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्या भिंतीवरून खाली घसरत होती. हातातली काठी बाजूला ठेऊन चपलेने तिच्यावर जोरात हल्ला करण्यासाठी सरसावलो. पण चपलेचा फटका चुकवून ती पुन्हा एकदा ड्रेसिंग टेबलच्या मागे शिरली. ती तशी घुसताच बेडरूमची खिडकी उघण्याचं धाडस केलं. पण ती बराच वेळ बाहेरच येईना. मग शेवटी थकून बेडररूमचा दिवा बंद केला आणि पडदा लावला, जेणेकरून बाहेरच्या खोलीतल्या दिव्याचा प्रकाश तिथे पोचणार नाही. पाली दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यामुळेच ती घरातल्याऐवजी बाहेरच्या प्रकाशाकडे आकर्षित व्हावी या उद्देशाने पडद्यांची लावालावी केली. खिडकीतून ती बाहेर जाईल अशी आशा ठेऊन आपल्या जागी पुन्हा स्थिर झालो. पुढे त्या पालीचं काय झालं ते माहित नाही. मी तिचं काहीच बिघवडलं नाही, पण तिने मात्र माझ्या झोपेचा पुरा चोळामेळा केला. ती जिंकली.

हे सगळे उपद्व्याप करेपर्यंत पाच वाजले होते. लॅपटॉप सुरू करून पालीला मारण्याचे किंवा हुसकावून लावण्याचे फंडे वाचायचं ठरवलं. तसंच पाल या प्राण्यावर उपलब्ध असणारी जुजबी माहिती वाचली. खरंतर हा प्राणी निरूपद्रवी आहे. मनुष्यप्राण्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. विषारी-बिषारी तर अजिबातच नसतो. चावत किंवा नखं वगैरेही मारत नाही. तरीपण माझ्यासारख्या अनेक जीवांना या सरपटी खेळणा-या प्राण्याविषयी कमालीची िकळस आणि चीड आहे. पालीला कसे मारावे, तिच्यापासून सुटका कशी मिळवावी, घरात शिरण्यापासून तिला दूर कसे ठेवावे यासाठी इंटरनेटवरील विविध डिस्कशन फोरममध्ये अकलेचे जे काही तारे तोडले आहेत ते बघून पाल हा फार मोठा आणि अभ्यासाचा विषय असल्याचं ठाम मत झालंय. मुळात पालीला मारूच नये. घर स्वच्छ करण्याचं काम त्या करतात. ढेकूणांपासून ते कोळी, किडे खाऊन घराची साफसफाई करतात अशी धारणा करून अनेकांनी तिला मारण्यावर विरोध दर्शवला आहे. कोंबडीच्या अंड्याचं कवच, मोराचं पीस, कांदा किंवा आलं चिरून त्याचा रस िभंतीवर लावण्यापासून ते पालीशी मैत्री करणं, तिच्यावर मूत्रविसर्जन करणं इथपर्यंतचे मोफत सल्ले इंटरनेटवर मुबलक प्रमाणात देण्यात आले होते. कांदा किंवा आल्याचा रस भिंतीला लावला तर पाल कदािचत येणारही नाही पण त्या वासाने जिणं मुश्किल नाही का होणार. काहींनी तर असंही म्हटलंय की कांद्याचे पापुद्रे सेलोटेपने भिंतीवर चिकटवावे. हा म्हणजे कहर झाला बरं का. पण यासगळ्यांमधला अत्युच्च उपाय कुठला मांडला असेल तर तो म्हणजे व्हॅक्युम क्लीनरचा वापर करून पालीला शोषून घेणे. हॅट्स ऑफ.

इंटरनेटवरील चर्चासत्राची एक लिंक इथे देत आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20061021201602AA2uucK