Saturday, October 27, 2012

भेजादान

पहिली व्यक्ती - अच्छा, म्हणजे बटाट्याच्या भाजीत बटाटा घालावाच लागतो तर. सॉल्लिडच.
दुसरी व्यक्ती - सॉल्लिड काय यात.  नाहीतर काय आंबा घालणार का बटाट्याच्या भाजीत.
पहिली व्यक्ती - हां. तेही आहेच म्हणा. पण मग ती भाजी शिजवण्यासाठी चूल पेटवावी लागत असेल ना.
दुसरी व्यक्ती - नाही. हे सगळं मिश्रण घेऊन ऊन्हात उभं राहायचं. कालांतराने, किती ते सांगता येणार नाही, भाजी तयार होते. फुल्या फुल्या फुल्या...गॅसवर नाहीतर काय बुडावर ठेऊन शिजवणार का.
पहिली व्यक्ती - तसं नाही. म्हणजे त्यासाठी लाकडं किंवा गॅस हवा ना. जळणं किंवा जाळणं आलं ना त्यासाठी.
दुसरी व्यक्ती - स्तःची काही हाडं काढून जाळली तरी चालतं. शेवटी तेवढा त्रास आणि वेळ कमी लागेल. फुल्या फुल्या फुल्या जगात कुठलीही गोष्ट शिजवायला काहीतरी गरम लागतं. सामान्यतः, सामान्य माणूस चूल किंवा गॅस जाळतो.
पहिली व्यक्ती - ओह. ओके. पण मग बटाट्याशिवायही काहीतरी घालत असतील ना भाजीत. का नुसताच बटाटा.
दुसरी व्यक्ती -  तुझ्या फुल्या फुल्या फुल्या. चव काय उधारीने येणारे का भाजीला. मीठ, मसाला, कडीपत्ता इत्यादी. गोष्टी घालाव्या लागतात. फोडणी नावाची एक प्रक्रियाही असते शिजवण्याआधी.
पहिली व्यक्ती - ओह, फोडणी द्यायची असते का आधी. पण मग भाजीला पिवळा रंग कसा येतो.
दुसरी व्यक्ती - कॅमलिनचे वॉटर कलर्स येतात ना. त्यातली पिवळ्या रंगाची बाटली घेऊन त्यातले दोन थेंब टाकायचे.
पहिली व्यक्ती - अय्या, खरंच की काय. मला तर बुवा निळा रंग आवडतो. मी दोन थेंब िनळ्या बाटलीतून टाकेन.
दुसरी व्यक्ती - तुझ्या फुल्या फुल्या फुल्या...भो....च्या......गा.....मा.....चु....चित्रकला सुरू आहे का.....भ....अ...फु.....  हळद नावाचा प्रकार माहित्येय का ऐकून......ल....वेड.....  ती लावतात बटाट्याला.
पहिली व्यक्ती -  अय्या, बटाट्याची पण हळद होते का. मज्जाच की.
दुसरी व्यक्ती - चो.... लावतात म्हणजे हळद घालतात यार....म्हणून पिवळा रंग येतो.....फुल्या फुल्या फुल्या...राहू दे.....आपण पिझ्झा ऑर्डर करूया.....भाजी राहू दे.....

रक्तदान श्रेष्ठ दान. देहदान, नेत्रदान करते ती व्यक्ती महान...वगैरे वगैरे....मुळात दान ही गोष्टच भारी. माणसाने दानी असावं, नेहमी कुणाला काही ना काहीतरी देत राहावं. अगदी कर्णासारखं दानशूर नसलं तरी चालेल. कवचकुंडलं नाही तर निदान कवच असलेलं अंडं द्यायला काहीच हरकत नसावी.  पण किती द्यावं याला मर्यादा असावी असं समर्थांनी सांगितलं आहे. (मला माहित नाही खरं कुणी सांगितलंय ते. पण शाळेत असताना एक सर कुठलंही वाक्य समर्थांची फूटनोट लावून द्यायचे. ती सवय लागली.) स्वतःकडचं सारंकाही देऊन फकिर होणं याला दानी म्हणण्यापेक्षा अडाणी म्हणणं योग्य.

असो. इथे खरंतर मुद्दा वेगळा आहे. बटाट्याच्या भाजीच्या पाककृतीवर जो काही बलात्कार वरती झाला, त्यातून अशाच एका दानाविषयी शंका उपस्थित होते. शरीराचा सर्वाधीश असणारा मेंदू नावाचा एक प्रकारही दानाच्या पेटीत जाऊ शकतो का, हा तो प्रश्न आहे. मेंदू गहाण ठेवण्यापेक्षा, कर्णाला लाजवेल अशा प्रकारचा दानशूरपणा भेजादान या प्रकाराला म्हणता येईल का.

खरंतर यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्यांनी भेजादान केलं आहे ते आणि ज्यांना या दानाची आवश्यकता आहे ते. वरच्या संवादांमधली पहिली व्यक्ती अशी आहे की जिच्या सहवासात राहिल्यानंतर भेजा गायब असणारी व्यक्ती कशी दिसते या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकते. आता ही जी पहिली व्यक्ती आहे तिने एकतर भेजादान केलं असेल किंवा मग तिला एखाद्या दात्याचा शोध असेल. पण यातून एक गोष्ट मात्र नक्की की दोन्ही प्रकारच्या व्यक्ती एकसारख्याच वागतात. पिंज-यात दिसणा-या वाघाकडे बोट दाखवून हा कोण आहे असा प्रश्न विचारणा-यांना, या प्राण्याला हत्ती म्हणतात आणि त्याने स्वतःला चाबकाचे फटके मारून घेतल्यामुळे शरीरावर चट्टे उमटले आहेत, असं उत्तर खुशाल द्यावं.

स्पष्ट बोलायचं झालं तर केवळ देवाने घडवताना कवटी बनवली म्हणून त्यात जे काही पुरण भरलंय त्याचा वापर केला पाहिजे असा समज असणा-या नाठाळ व्यक्तींच्या सहवासात राहू नये. समर्थांनी म्हटलंच आहे......(समर्थांचं राहू द्या..) समोरच्याने निर्बुद्धपणाचं दर्शन दिल्यास आपण त्याला लाजवेल अशा पद्धतीने निर्बुद्धपणाचं विराटदर्शन द्यावं. त्यातून काही सिद्ध होवो न होवो पण मनासी सुखशांती लाभे. जय जय "लघुवीर" समर्थ.

तात्पर्य - कृपया भेजा भेजादान मे डालें| यहाँ-वहाँ भेजा न फैलाइये| इससे बिमारियाँ फैल सकती है|

No comments:

Post a Comment