Sunday, October 7, 2012

....खळखळाट फार

आज खूप दिवसांनी लिहिण्याचा मूड झाला. का, कसा माहित नाही. काय लिहावं हेही सुचत नाहीए. पण कीबोर्डवर बोटं फिरवावीशी वाटली. आता यातून काय तयार होईल याचा काहीच थांगपत्ता नाही. हे म्हणजे स्वयंपाकघरात गॅसवर भांड ठेवावं आणि कोणती पाककृती करावी हे मनी नसतानाही जे काही मिळेल ते शिजवत बसवण्यासारखं आहे. खरंतर लिहिण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण जेव्हा खूप हा शब्द वापरतो तेव्हा त्याची मर्यादा कुठपर्यंत हेच कळत नाही. अमर्यादेला मर्यादेत घालू पाहणारा असा हा एक अमर्यादपणे जगणारा शब्द आहे.

एका टॅक्सीत सुरू झालेला प्रवास अजून सुरूच आहे. न ड्रायव्हर थकलाय, न पेट्रोल संपलंय, न वाटसरू थांबलाय, झोपलाय. गाडीची चाकं नशीबाच्या चक्राशी स्पर्धा करत फिरतायंत. एका कड्यावरून उडी मारून आता काळ लोटला. पण खाली पडायची चिन्हंच नाही. उडायला लागलो का या प्रश्नालाही अर्थ नाही कारण पंखही दिसत नाहीत. तर मग नक्की काय चाललंय. पंख फुटायची प्रक्रिया अजून सुरूच आहे का. की उडण्याची कला अद्याप अवगत झाली नाही असंच म्हणायचं. गाडी नक्की कुठे जातेय हे खुद्द त्या चाकांनाही माहित नाही. प्रत्येकजण आपापलं काम करतोय, प्रामाणिकपणे. गाडी कधीतरी थांबणार हे नक्की आहे. पण दरवाजा उघडून बाहेर पडणारं पहिलं पाऊल कुठे असेल याची यत्किंचितही कल्पना नाही. वा-याची एक झुळूक आली आणि टॅक्सीत बसवून गेली.

जगण्याला अर्थ हवा, एक गहिरता हवी, प्रत्येक गोष्टीच्या अगदी अंतःकरणापर्यंत जाऊन त्याचा विचार करावा आणि जीवनाचा आनंद लुटावा वगैरे संकल्पना नाही हो झेपत आपल्याला. लोकांना वरूनच स्पर्श करून जाणारे जीव आम्ही. आमच्या जगण्याला उथळपणाचा ठप्पा लागलेला. असेनात का उथळ, उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हणही आम्ही जगतो. पण या खळखळाटामुळेच तर कित्येकांना तिथे पाणी आहे याची जाणीव होते. अगदी अंतःकरणापर्यंत जाण्यासाठी लागणारी सहनशक्ती नाही आपल्यात. पण लोक तरी कुठे हो नदीच्या दहा फूट आतलं पाणी पितात. वरचंच पितात ना. मग खळखळाटाला आणि उथळपणाला दोष का. झ-याचा खळखळाट असतो हो तो. मस्त, बेफिकीरपणे जगण्याचं जीवंत उदाहरण ते. वरून खाली कोसळतानाही भीत नाही तो. आणि कुणी अडवलंच तर बाजूने सुममध्ये कलटी मारण्याची कलाही अवगत आहेच की. पण तरीही त्याला कल्पना असते की पुढे जाऊन आपल्याला हे शरीर समुद्रात विलीन करायचंय. इथे तर समुद्र आहे की नाही इथपासूनच सुरूवात. विलीन वगैरे पुढच्या भानगडी.

फाट्यावर....सर्वार्थाने कामी येणारा हा एक विचार आणि कृती. काही मोजके जीवजंतू सोडले तर इतरांना फाट्यावर मारत जगणं जमलं पाहिजे. नाही घुसायचंय आपल्याला एखाद्या विषयाच्या खोलात. खोलात जाताना अंधार लागतो आणि आपल्याला अंधाराची भीती वाटते. अंधारातून प्रकाशाकडे वगैरे सगळं ठीक आहे. पण आयुष्यात आधीच उजेड पडला असताना अंधाराची इच्छा का बाळगावी. जिथे गरज आहे तिथे खुशाल खोलात शिरावं. पण प्रत्येकवेळी काय म्हणून. फारफार वरवरचा विचार करता तुम्ही राव म्हणणा-यांची कीव येते आपल्याला. करतो आम्ही वरवरचा विचार, काय म्हणणंय आपलं. तुम्ही खोलात जायच्या गप्पा मारता ते वरून खाली शिडी टाकून. बिनधास्तपणे खोलात जायची आहे का हिंमत. त्या झ-यासारखी वरून खाली निर्भीड उडी मारण्याची ताकद आहे का शरीरातल्या कुठल्याही भागात. असेल तर करून दाखवा, फालतू शब्दांच्या बिया पेरून गप्पांची शेती उगवू नका.

म्हणे काय तर आयुष्यात स्थिरस्थावर नको का व्हायला. आयुष्यात एक तरी अशी गोष्ट दाखवा जी पहिल्यापासून स्थिर आहे, त्या ध्रुवालाही कॉम्प्लेक्स येईल असा स्थिर होऊन दाखवतो. घेता का चॅलेंज. झरा थांबला की पाणी साचतं. ते साचलं की त्यात अनेक गोष्टी साचतात, साठतात आणि नासतात. परिणामी पाणी खराब होतं. म्हणूनच झरा सतत वाहत राहिला पाहिजे, खळखळाट असला पाहिजे आणि कोसळण्याची तयारी पाहिजे.

(एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. रात्री कधीही कुठेही लिहायला बसलो की अँब्युलन्सचा सायरन कानावर पडतो. हटकून पडतोच. का कोण जाणे.) 

No comments:

Post a Comment