Friday, September 23, 2011

एक गिरकी...

(महाराष्ट्र टाइम्स मुंबई टाइम्समध्ये शुक्रवार 23 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला हा लेख आहे.)

झुगाड करण्याचा सुगीचा काळ जवळ येतोय. म्हणजे अगदी सेटिंग बरं का. कुठल्याही चुकीच्या किंवा भ्रष्ट कामासाठी नाहीये हा झुगाड. तर आमच्याच ग्रुपला एका सार्वजनिक उत्सवात एकत्र जमवण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. कसंय, आज आहे शुक्रवार. बुधवारी घटस्थापना झाली की ढोल पिटायला आणि गरबा खेळायला सुरूवात. आता नाच म्हटलं की तुमच्या-आमच्यासारखा (चिर)तरूणवर्ग मागे कसा राहणार? रविवार असल्यामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत फुल ऑन अंग आणि पाय हलवून झालं आणि आता येणारा दांडिया म्हणजे कसं आपला ग्रुप घेऊन नुसता धिंगाणा हो. पण त्यासाठी, म्हणजे दहा एक टाळकी एकत्र आणण्यासाठी लई म्हणजे लईच (ई चारवेळा वाचलात तरी चालेल) मस्का आणि बरंच काही करावं लागतं.

गेल्या वर्षी कॉलेज आणि परीक्षा होती म्हणून एकच दिवस सगळ्यांबरोबर गिरक्या घ्यायची संधी मिळाली. उरलेले आठ दिवस स्वत:भोवतीच गिरकी मारून मग झोपी गेलो. पण त्या एका दिवसासाठी दहा जणा-जणींना आणि त्यांच्या परमपूज्यांना 'उच्च विचारसरणी आणि साधं राहणीमान' याचे धडे म्हणून दाखवायला लागले होते. का कोण जाणे, पण या गरब्याविषयी आणि विशेषकरून तो खेळायला जाणाऱ्या मुला-मुलींविषयी भलताच विचार केला जातो. मुलं मुलींना आणि मुली मुलांना टापतात असा शिक्काच या दांडियावर बसलाय. आता एक सांगा अशी कोणती जागा आहे जिथे टापा-टापी होत नाही? आणि या वयात ती नाही करणार तर कधी? पण हे असं परमपूज्यांना पटवताना नाही सांगता येत. लोकांत असलं की बऱ्याचशा गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. एका वरवर सोज्वळ वाटणाऱ्या मैत्रिणीच्या घरच्यांना आम्ही मुलं कशी चांगल्या घरातली आहोत, फक्त आमच्या ग्रुपमध्येच आम्ही कसे नाचणार, दहा वाजता दांडिया संपला की कसे सरळ घरी येणार वगैरे वचनांची फैरी भोळा चेहरा करून झाडली होती. त्या प्रयत्नांना फळंही आली होती. त्याचा रिपीट टेलिकास्ट यंदा एखाद्या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी करावा लागणार.

पण यावेळचा एक प्रॉब्लेम जरा नवीन आहे. काही पोरं-पोरी नोकरीधंद्याला लागलीत आता. काम, बॉस, पगार, लीव्ह वगैरे गोष्टी करायला लागली. कॉलेजमध्ये असताना अभ्यास, परीक्षा आता काय...? तर बॉस! म्हटलं शनिवार-रविवारी जाऊ तर म्हणे काय एचआरचं बॉण्डिंग आहे कुठे तरी डोंगरावर. आता दांडियासारखं बॉण्डिंगचं उत्तम ठिकाण सापडणार आहे का? आता ही मित्रावळ येईन म्हणतेय. पण, त्यांच्यासाठी सेटिंग करायचं म्हणजे ती कंपनी आमच्यापैकी कुणाच्या तरी परमपूज्यांची हवी ना.

ही अशी जमवाजमव करताना मुख्य लफडा असा की गरबा खेळायचं ठिकाण. सगळ्यांना त्या ठिकाणी येणं आणि तिथून घरी जाणं सोयीचं पाहिजे. (सगळ्याच सोयी पाहिजेत ह्यांना) गेल्या वषीर् जुहूच्या गरब्यासाठी गेलो होतो. तिथून रात्री घरी जाण्यासाठी एका गुज्जू मित्रालाही पटवला होता. त्याच्या गाडीत आपल्या काही टाळक्यांना जागा मिळवून दिली होती. त्यासाठी त्याला थोडा 'खाऊ'ही दिला होता. यावेळी घाटकोपरच्या 'संकल्प'ला जायची इच्छा आहे पोरांची. म्हणजे पासेसचा मेजर झोल. आत्तापासूनच सेटिंगला सुरूवात केलीय. शनिवार-रविवार दोन दिवसांचे पासेस म्हणजे खिसा हलका. 'जॅक लावून' व्हीआयपी पासेस मिळवण्यासाठी एका स्पॉन्सर कंपनीतल्या पोराला पटवायचा खटाटोप सुरू आहे. त्यासाठी रविवारपासूनच त्याला नाक्यावर चहा पाजायला सुरूवात केलीय. शुक्रवारपर्यंत नक्की देतो म्हणालाय. म्हणजे यंदा दोन दिवसांचा तरी प्रश्न सुटणार.

शनिवार-रविवारसाठी व्हीआयपी पासेस मिळणार हे ऐकल्यावर पोरं आणि विशेष करून पोरींचा पुढचा प्रश्न आहे, तो ड्रेसचा. त्याला घागरा-चोली लागले ना? (आता हे तरी स्वत:चं स्वत: बघा ना) त्यासाठी उद्याचा शनिवार शॉपिंग म्हणजे या मुलींबरोबर सुट्टीचा दिवस बरबाद करा. १०० दुकानं फिरा, मॅचिंग रंग बघा, त्यावर अगदी तश्शीच अॅक्सेसरीज शोधा, त्यानंतर टिपऱ्या. हुश्श! मुलींचं नटणं-मुरडणं ठीक आहे हो पण एक कार्टा म्हणे 'तो राजस्थानी फेटाच पाहिजे.' 'हो, घेऊ' असं म्हणण्यापलिकडे काय करणार?

मस्केबाजी, वचनं, भोळेपणाची नाटकं आणि बरंच काही करून टाळकी जमली, ठिकाण ठरलं, पासेस मिळाले, कपडेलत्ते शोधले. हा सगळा खटाटोप केवळ दोन दिवसांच्या त्या गिरक्यांसाठी. लोक विचारतात सांगितलीत कुणी ही थेरं करायला? आमचं उत्तर ठरलेलं 'एरवी तुम्ही सांगता ते आम्ही ऐकतो ना? सणासुदीला, पाहुणे आल्यावर, नातेवाईकांसमोर गुणी बाळांसारखे वावरतो ना? फार कमीवेळा आम्ही नाचण्या-बागण्याच्या गोष्टी करतो हो. दांडियाबद्दल तुमच्या मनात काहीही असो. आम्ही त्याच्याकडे 'एक गिरकी.. जो दुनिया घुमा दे' या दृष्टीकोनातूनच बघतो आणि तसंच बघणार.' जय गिरकी.. जय गरबा. दांडिया रमवानु, खूब खेलवानु मज्जानी लाइफ. 


No comments:

Post a Comment