Tuesday, September 6, 2011

उगीचच

 बरेच दिवसात ब्लॉगकडे बघितलंच नाही. जिवंत आहे की नाही तपासायला लिंकवर क्लिक केलं तर सगळंकाही जागच्या जागी होतं. बरं वाटलं. तसं गोष्टी जागच्या जागी असण्याची सवय नाही त्यामुळे जरा वेगळंच वाटलं. आलोच आहोत मग म्हटलं काहीतरी लिहावंच, थोडावेळ की-बोर्डवर बोटं हाणावीत. सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं तसं काहीच नाहीये हो. पण आपलं उगीचच.
आजच्या दिवसातली (न) सांगण्यासारखी एक गोष्ट आहे खरंतर. जरा विचित्रच आहे पण अनेक अर्थ दडलेली घटना आहे ही. आजच्या एकाच दिवसात तब्बल तीनवेळा कावळा शीटला अंगावर आणि तेही रात्रीच्या अंधारात. म्हणजे दिवसा उजेडी असा काही गैरप्रकार केला असता तर त्याच्या मागे लागून वचपा काढला असता अशातला भाग नाही. पण तीनदा म्हणजे जरा जास्तच झालं. शुभ-अशुभ हा वेगळाच मुद्दा आहे. पण अहो दुस-याचं समाधान आपल्या अंगाखांद्यावर का घ्या? म्हणजे दुस-याच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, त्याच्याही आनंदात मी सहभागी आहे पण ही पद्धत नाही ना. याला सहभाग म्हणता येऊ शकत नाही.
ते काहीही असो, पण यातून एक निरीक्षण आणि त्यातून पुढे जाऊन (कावळा शीटला नाही तर) निष्कर्ष काढता येऊ शकतो की (बहुतांश) कावळ्यांची उत्सर्जनाची वेळ अंधार पडल्यावरची असते. दिवसभर खा खा खाऊन....पचनक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंधारात कुणाचं फारसं लक्ष नसताना हळुचकन उत्सर्जनक्रिया पार पाडली जाते असे म्हणता येऊ शकते. हे संशोधन अजून पूर्ण झालेले नसून केवळ हायपोथिसिस मांडण्यात आला आहे. या घटनेतून अजून एक गोष्ट सिद्ध होते की रात्रीच्या अंधारातही कावळ्यांचा नेम अचूक असतो. एकच डोळा आणि काळोख असला तरी एक अदृश्य शक्ती कावळ्यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कावळा हा तसा शक्तीशाली पक्षी आहे. आत्म्याचं वाहन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पिंडाला कावळा शिवला म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळाली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो आत्मा कावळ्याच्या पाठीवर बसूनच पुढच्या स्टेशनला जातो. ते श्राद्धाचं जेवून, आत्म्याला पोचवून परतीचा प्रवास करेपर्यंत सांयकाळ उजाडणं साहजिकच. आणि या एवढ्या व्यस्त दिनक्रमात "मोकळं" व्हायला वेळ मिळणंही जरा अवघडच. त्यामुळेच की काय रात्रीच्या समयी जरा निवांत होण्याआधी ही क्रिया उरकून घेतली जात असावी. जो आत्मा पोचवला त्याच्याच वंशजावर ही पोचपावती पाठवली जात असेल.

कावळ्याची हुशारी दर्शवणारा एक व्हिडिओ मला प्रचंड आवडला. 
खरंतर मोरापेक्षा कावळ्याला आपला राष्ट्रीय पक्षी घोषित केलं पाहिजे. त्याच्याएवढा चतुर, हुशार, चाणाक्ष आणि तितकाच लोभस, रूबाबदार, आकर्षक (ही विशेषणं कावळ्याच्या संदर्भात समजण्यासाठी त्याला जवळून पाहणे गरजेचे आहे.) पक्षी शोधून सापडणार नाही. ब्लॅक ब्युटी म्हणतात ती हीच. मी तर म्हणेन की ब्लॅक ब्युटी विथ ब्रेन आहे. जंगलामध्ये वाघ, सिंह किंवा इतर मांसभक्षक प्राणी बाहेर पडले की माकडं धोक्याचा इशारा देतात. पण गावांमध्ये वगैरे माकडांना हुसकावून लावण्यासाठी कावळ्याचा आवाज काढला जातो. वाघ, सिंहसदृश प्राण्यांनी याचा विचार करून कावळ्याशी करार केला पाहिजे असे एक प्रामाणिक मत आहे (याचा मतप्रवाह आणि पुढे जाऊन विचारसरणी तयार झाली पाहिजे) कावळा हा खरोखरच आदराला प्राप्त पक्षी आहे.
असो, हाणलेली बोटं आता कोकलाया लागलीत आणि पोटात पण कावळे ओरडू लागलेत. काही फार अवजड वगैरे लिहायची इच्छा आणि शक्तीही नव्हती. मनाला आणि त्याहून जास्त शरीराला स्पर्शून गेलेली ही घटना होती त्यामुळे वरचा प्रपंच त्याचेच पडसाद आहेत असे मानले जावे. एवढं लिहून आपले दोन शब्द संपवतो. जय हिंद जय काव.

तळटीप - अंधारात शीटलेला पक्षी कावळाच होता कशावरून? असा प्रश्न जाणकारांनी कृपया विचारू नये. आणि अजाणते असाल तर अजून खूप आयुष्य आपल्याला अनुभवायचंय असं स्वतःला समजावे.

कावळ्याच्या या काही लोभस छबी

                                        कावळ्याच्या पोटात जेव्हा कावळे ओरडतात                                       उड्डाणापूर्वी                                                      दो कव्वों का जोडा बिछड गया रे


                                         तुझ्यामाझ्या सवे


                                          माझी होशील का?


                                         सागरा प्राण तळमळला...

1 comment: