Wednesday, July 20, 2011

भोगरा

प्रिय विश्वनाथ,

एखाद्या न दिसणा-या जीवाणू-विषाणूसारखा मृत्यू सभोवताली घुटमळत असतो. कधी कुणाला कसा काय त्याचा संसर्ग होईल काहीच सांगता येत नाही. त्या अदृश्य शक्तीला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नसतं. पण एखादी व्यक्ती अचानकपणे शरण जाते आणि......सुन्न होतं सगळं. असं काही होऊ शकतं हे कुणाच्या ध्यानीही नसतं हो. 

रोज सकाळी उठायचं. आवरा-आवर करायची. ऑफिसला जायचं. कामं उरकायची. संध्याकाळी नाक्यावर टवाळक्या करायच्या. दुनियेला फाट्यावर मारत चार शिव्या हासडायच्या. घरी येऊन जेवून शांत निजायचं. ठरलेला दिनक्रम. सगळं गृहीत धरलेलं. पण एखाद्या दिवशी गृहितक चुकलं म्हणजे? संपलंच की. पायाखालचा रस्ता असणारच आहे असं मनात धरून आपण चालत असतो. पण एकेदिवशी तोच दुभंगला म्हणजे मग कळतं की आपल्यासाठी खूप गोष्टी taken for granted असतात.

मूंगडाल चिलीया...मूंगडाल चिलीया ओरडत तू यायचास आणि समस्त पत्रकारांच्या पोटातल्या कावळ्यांना खाऊ घालायचास. लहानांपासून थोरांपर्यंत आणि काल आलेल्या नव्या भिडूपासून ते जुन्या जाणत्या गड्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी...खाण्याच्या वेळा तुलाच माहिती. "उपर क्या है?" या प्रश्नाला "कॅण्टीन" असं मिश्कील उत्तर देऊन खट्याळ हसू तोंडावर आणायचास. हळूच कानात येऊन "मेरे बेटे के लिए फटाके का बंदूक लायेगा?" विचारायचास.

अरे विश्या उद्या कुणाला हाक मारून चहा मागायचा रे? "रिपीट" अशी आज्ञा वजा विनंती कुणाला करायची? अरे तू रोज असणारच हे मनात धरलंच होतं आम्ही. असा निघून जाशील असं कधी वाटलंच नव्हतं रे. कपातून चहा आणणारा तू, डोळ्यांतून पाणीही आणलंस. वा रे वा. शाब्बास!

तुझ्या त्या भोगरा या शब्दाचा अर्थ मला तरी कधी कळला नाही. आणि यापुढे मी तो कुणाला विचारणारही नाही.

रारंगढांग पुस्तकातलं ग्यानसिंगच्या तोंडचं वाक्य आठवलं. "आदमी जब मर जाता है तो उसका क्या रहता है? एक यादगारी!"

तुझा रिपीटर