Wednesday, May 18, 2011

अखेरचा हा...


शाळेच्या दारात असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला वाकून केलेला नमस्कार... हा पार्ले टिळकच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर नकळत झालेला संस्कार. 'त्या'दिवशी केवळ शाळकरीच नव्हे तर कमरेत वाकलेले आजोबाही शाळेत जमले होते आणि तसाच नमस्कार करत होते... बघताबघता सारे मैदानभर माणसं जमली.. आणि शिपाईमामांनी घंटेचे टोल दिले... सर्व मुले जागेवर स्थिर झाली आणि मे महिन्याची सुटी असूनही प्रार्थनेचे सूर निनादले...
निमित्त होते जुन्या इमारतीला द्यावयाच्या निरोपाचे. त्यासाठी नेहमी आखून ठेवलेल्या लाल मातीच्या मैदानावर लाल कार्पेट अंथरण्यात आले होते. पूर्ण मैदानभर मांडलेल्या खुर्च्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या. बाजुच्या रांगामध्येही विद्यार्थी उभे होते. ही एवढी गर्दी कशासाठी जमली होती... तर आपल्या शाळेची इमारत आता इथे नसणार. नव्या इमारतील हीच शाळा पुन्हा भरेल. पण आपण ज्या वास्तूत घडलो, शिकलो, रडलो, पडलो ती वास्तू आता नसणार... म्हणूनच प्रत्येक जण वर्गातल्या बाकापासून प्रसाधनगृहापर्यंतच्या अनेक ठिकाणांचे फोटो कॅमेरॅत साठवत होते... तर काही डोळ्यात. पण त्या प्रत्येक डोळ्याच्या कडा आठवणींच्या अश्रूंनी ओल्याचिंब झाल्या होत्या.
एखादी इमारत ही फक्त वास्तू नसते तर संस्कारांचे बाळकडू पाजत भविष्यात भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ देण्याचं काम करत असते. त्या वास्तूमध्येच ते भिनलेलं असतं. एखाद्या व्यक्तीच्या नावाभोवती जसं वलय असावं तसं त्या वास्तूच्या बाबतीत होतं. पार्ले टिळक विद्यालय हे नाव आणि वास्तूही याला अपवाद नाही. ही शाळा आता नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे. पण या नव्वदीपैकी साठ वर्षं एकाच ठिकाणी अचल पर्वताप्रमाणे उभी असलेली वास्तू आता पाडण्यात येणार आहे.

बदल हा निसर्गाचा नियम असला तरी हा बदल मात्र माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणा-या आहेत. साठ वर्षं जुनी इमारत पाडून नवीन इमारतीत शाळा सुरू होणार हे बरेच दिवस ऐकून होतो. मुळात शाळेची इमारत पाडणार हे ऐकूनच कसंस झालेलं. निरोप द्यायच्या दिवशी कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी शाळेत गेलो. गेटमधून आत शिरलो आणि आपोआपच मुलांचा आरडाओरडा, डस्टर बाकावर आपटणं, कविता, पाढे ऐकू येऊ लागले. समोरची चित्रं झपाझप बदलत गेली.

शाळेतली ती एका विशिष्ट चालीत वाजणारी घंटा, शाळा भरल्याची, सुट्टी झाल्या अगर संपल्याची, शाळा सुटल्याची जाणीव करून द्यायची. सकाळी व्यवस्थित इस्त्री केलेल्या कपड्यांची, संध्याकाळी मातीच्या रंगाशी स्पर्धा चालायची. मोठ्या उत्साहाने सकाळी शाळेत आगमन व्हायचं आणि शाळेत घडणा-या 'धड्यांचा' परिणाम मूडवर होऊन त्याच मूडमध्ये संध्याकाळी घरी यायचो. मग हातपाय धुऊन त्याच मूडनुसार रात्र जायची.

मूल्यशिक्षण आणि पर्यावरणाची महती कितीही असली तरी ते दोन्ही तास कंटाळवाणेच असायचे. याचा काय फायदाय?” हे एकमेकांना समजावण्यात तो पहिला तास जायचा. आणि मग रांगेत बम्बार्डिंग सुरू व्हायचं. एखाद्या विषयाच्या सर किंवा बाई मजेशीर असल्या की तास मजेत जायचा, कधी संपायचा ते कळायचंच नाही. तोच एखाद्या कंटाळवाण्या शिक्षकाचा असला की पुस्तकातली 'व्यक्तिमत्वं रंगीत' होऊ लागत किंवा मग वहीचं शेवटचं पान भरायला सुरूवात व्हायची.

तासाला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की कसंतरी व्हायचं. बरेचदा तर दुस-याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माहित असायची. पण नेमकं स्वतःला विचारल्यावर गोची व्हायची. बरोबर उत्तर दिलं की हवेतून फेरफटका व्हायचा. विषयाचे तास ठिकठाक असले तरी मज्जा यायची ती चित्रकला आणि कार्यानुभवाच्या तासाला. शिवणकाम काय, सरळ टीप, उलटी टीप, साखळी टाका, गव्हाचा टाका काय, हस्तकला काय, कागदाच्या वस्तूच काय बनवायचे...क्रिएटिव्हिटीची शेतीच चालायची. एकदा कंटाळा येऊन तर काही मित्रांनी एकमेकांचे केसच कापले होते. यांच्या बरोबरीने असणारा शा.शि (शारीरिक शिक्षण)चा तास म्हणजे पांढरा रंग किती बदलू शकतो याचा प्रत्यय आणून देणाराच.

बॅकबेंचर्स आणि पुढल्या बाकावरील मुलंयांच्यात खुन्नस असायची. अगदी कोल्डवॉर. बॅकबेंचर्स म्हणजे आडदांड आणि टवाळक्या करणारी तर पुढली मुलं म्हणजे अतिहुशार, अतिसिन्सिअर, आगाऊ. थोडक्यात, प्रत्येक बाबतीत जरा अतिच. शेवटच्या बाकावर बसून शिक्षकांची, पुढल्या बाकावरच्या मुलांची आणि प्रसंगी मुलींच्या खोड्या काढण्यात काय मजा होती कुणास ठाऊक. जमवलेले खडूचे, खोडरबराचे, पेन्सिलीचे तुकडे, कागदी रॉकेट्स एकमेकांना मारताना जबर मजा यायची. पुस्तकं, कंपासपेट्या, डबे इतकंच काय तर अगदी दप्तरं लपवण्याचे प्रकारही तासाला बिनदिक्कतपणे सुरू असायचे.
फेकाफेकीमध्ये चुकून ते बाई-सरांना लागलं की संपलं. मग फक्त आणि फक्त शिक्षा. हा प्रकारच मुळी अजब होता. आता मजेशीर वाटत असला तरी तेव्हा जबर भीती वाटायची. हातावर आडवी किंवा उभी पट्टी मारणे, बाकावर, वर्गाबाहेर, भींतीकडे तोंड करून उभं राहणे, शिक्षकांच्या बाजूला खाली जमिनीवर बसणे, ग्राउण्डला फे-या मारणे, माहितीपुस्तकात 'मी असं परत कधी करणार नाही' हे लिहून त्यावर आई-वडिलांची स्वाक्षरी आणणे, एखादा धडाच लिहून आणणे हे प्रकार अनुभवताना काय हालत व्हायची ज्याची त्यालाच ठाऊक.
बाकावर उभं केलं की, आपण सगळ्यात उंच आहोत यातच धन्यता मानून इतरांना चिडवून दाखवलं जायचं. 'बाई, मला पाठीचा त्रास आहे' वगैरे काकुळतीला येऊन सांगितलं की नुसतंच उभं राहावं लागायचं. वर्गाबाहेर उभं करण्यासारखी शिक्षा नाही. गॅलरीतून दिसणारं विहंगम दृश्य बघताना ही शिक्षा नसून एक प्रकारची दिक्षाच आहे असं वाटायचं. माझ्या एका मित्राचं माहितीपत्रक तर 'मी तास सुरू असताना बाक वाजवत होतो' या व यासारख्या वाक्यांनी भरलं होतं. पुन्हा एकदा शिक्षा झाल्यावर तो म्हणाला की माहितीपत्रक भरलंय. तेव्हा त्याला वहीवर लिहून आणायला सांगितलं, हा भाग निराळा.

तासाला त्या विषयाचं पुस्तक आपल्याजवळ असणं किंवा नसणं आणि नसल्यास त्यामागची कारणं हा खरंतर पीएचडीचा विषय आहे. विषय कुठलाही असो, पुस्तकातल्या चित्रांवर चित्रकलेचा तास सुरू व्हायचा. व्याकरणातले लिंग बदलइथे वास्तवात उतरायचे. कविता, धड्यांमध्ये नको नकोते शब्द घालून किंवा काही अनावश्यकशब्द गाळून विषय नीट समजून घेतला जायचा. ए.वा.उ, पू. वा. उ., रि.जा.भ., ए.श.उ, महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे, ऑप्शन अशा शब्दांनी पुस्तकाला वेगळीच शोभा यायची. त्यातही ते भूमितीचं पुस्तक असेल तर ऑप्शन हा शब्दच इतर कुठल्याही आकृतीपेक्षा जास्तवेळा दिसायचा. प्रयोगवह्या, निबंधवह्या, मूल्यशिक्षण-पर्यावरणाच्या वह्या क्वचितच पूर्ण असायच्या. गृहपाठ हा प्रकार तर घरी जाऊन मुद्दाम विसरला जायचा. फार कमी जणांनी पाचवी आणि फार फार तर सहावीनंतर गृहपाठ केला असेल.

शाळेतल्या स्पर्धा, वार्षिकोत्सव, क्रीडामहोत्सव, आंतरवर्गीय सामने, समूहगायन स्पर्धा, अथर्वशीर्ष स्पर्धा यात तर दोन वर्गांमध्ये चुरस असायची. १५ ऑगस्टची रांगोळी स्पर्धा असो किंवा सर्वोत्कृष्ट हस्तलिखिताची स्पर्धा असो, अभ्यासाची ढाल असो की खेळांसाठी मिळणारी ढाल असो, ती मिळवण्यासाठी सगळेचजण जीव तोडून मेहनत करायचे. दोन वर्गांमध्ये भांडणं, वादावादी, मारामारीसुद्धा व्हायची. शिक्षक पार्शिलिटीकरतात हे वाक्य आपण हरलो की तोंडून बाहेर पडायचं. हरणं सहनच व्हायचं नाही.

पटांगण, भूगोल दालन, चित्रकला, संगणक कक्ष, संगीत कक्षा, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, कचेरी, शिक्षक व शिक्षिका, पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका, मुख्याध्यापिका या नावाच्या पाट्या असणा-या खोल्यांनी त्या वास्तूला खुलवलंच. संध्याकाळच्या वेळी पटांगणावर पाणी मारताना मातीचा दरवळणारा सुगंध दिवसभराचा ताणच घालवायचा. ते मारणारे माळी किंवा शिपाईदादा हे व्यक्तिमत्त्व नसून एक रसायनच म्हणा ना. काहींची अशक्य भीती वाटायची. तर काही काका जवळचे वाटायचे.

या सगळ्याबरोबरच असणारी तीही शालेय जीवनातली महत्त्वाची व्यक्ती. तीच्या असण्या किंवा नसण्यावर आपलं वर्गात असणं किंवा नसणं अवलंबून असायचं. तीने आपल्याकडे बघून स्मितहास्य केलं की आपण वर्गातून थेट स्वर्गात जायचो. हीफक्त माझ्यासाठीच आहे किंवा मी फक्त तीच्यासाठीच जन्माला आलोय वगैरे वगैरे जोशपूर्ण डायलॉगबाजी (अर्थात मनातल्या मनात) चालायची. रक्षाबंधनला मात्र तीला अजिबात भेटायचं नाही, हा नियमच होता.

शाळेचं भव्य पटांगण, टिळकांचा पुतळा, पहिल्या मजल्यावरची ती घंटा, फळा, खडू, डस्टर, शाळा भरल्यावर (किंवा सुट्टी संपल्यावर) लागणारी रेकॉर्ड, नंतर होणारी प्रार्थना, मौन, ध्वनिक्षेपकावरून सादर केले जाणारे कार्यक्रम, ओळीने होणारे कमी-अधिक कंटाळवाणे तास, ऑफ पिरियड, तासाला चालणा-या घडामोडी, चिडवाचिडवी, भांडणं, एनसीसी-एमसीसी परेड, व्यायामप्रकार, मोठ्याने म्हटलेल्या कविता, पाठ केलेली वृत्तं, सुभाषितं, सुट्टीतले डबे, हरवलेल्या कंपासपेट्या, वॉटरबॅग्ज, वह्या, पुस्तकं, पेनं, पेन्सिलीचे, खोडरबरांचे तुकडे, बाकावर केलेलं कोरीव काम, रंगवलेल्या भिंती, त्यावर लिहिलेले सुविचार’, प्रयोगशाळेत फोडलेल्या टेस्टट्यूब्स, चंचूपात्रं, चित्रकलेच्या तासाला काढलेली व्यंगचित्रं, कार्यानुभवाच्या तासात घेतले जाणारे वेगळेच अनुभव, दरवर्षी निघणा-या सहली, वार्षिकोत्सव, क्रीडामहोत्सव, मिळालेल्या ढाली, वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा, पथनाट्यं, विज्ञान मंडळ, प्रश्नमंजुषा, अपूर्ण गृहपाठ, अनियमीतपणे पूर्ण केलेल्या प्रयोगवह्या, भोगलेल्या शिक्षा, आपल्या चुकीमुळे दुस-याने भोगलेल्या शिक्षा, होणा-या पालकसभा, केल्या जाणा-या तक्रारी, वर्गप्रतिनिधींबरोबरची भांडणं, अभ्यासाचं, मार्कांचं, परीक्षेचं, ‘तीचं टेन्शन....हे सारं काही शाळा सुटली आणि सुटलंच. तेव्हा सुटलेली ती शाळा पुन्हा कधी भरलीच नाही. पण सुटताना त्या चालीत वाजणा-या घंटेच्या टण् टण्मधला शेवटचा टण् मात्र अजूनही कानात घुमतो आहे.

...आतापेक्षा अधिक मोठ्या नव्या इमारतीत, चकाचक वर्गामध्ये उद्या 'पार्ले टिळक'चे वर्ग भरतील... इमारत बदलली तरी संस्कार, मूल्यं, तो टिळकांचा पुतळा सारे सारे असेल... पण माझ्यासारख्या शेकडोजणांचं बालपण समृद्ध करणारी 'ती' शाळा नसेल...