Thursday, April 14, 2011

गुंSSS...गुंSSS

शब्द तयार होण्यामागे काही घटना किंवा कारणं असतात. सबळ कारणातूनच शब्दाची व्युत्पत्ती होत असते ही जगन्मान्य थिअरी आहे. पण डास हा असा एक शब्द, प्राणी, कीटक, सजीव आहे की ज्याची व्युत्पत्तीच नव्हे तर उत्पत्तीही का झाली असा यक्षप्रश्न पडलाय. या भूतलावर आपण जगतो आहोत याचं काहीतरी कारण आहे, वगैरे लई वरच्या दर्जाचे विचार आहेत. पण काही सजीवांच्या असण्याला निमित्त आहे. उदा. अन्नसाखळी. हरीण गवत खातं, वाघ हरीण खातो, वाघ मरतो, त्याचं प्रेत जमिनीला मिळतं, गवत तयार होतं, पुन्हा हरीण, पुन्हा वाघ, पुन्हा प्रेत...असं सगळं चक्र आहे. पण अन्नसाखळीत डासाची भूमिका काय आहे याचं संदर्भासहित स्पष्टीकरण शोधण्याची कामगिरी सध्या हाती घेतली आहे. (त्यासाठी तीन मार्कांची तरतूद आहे)
मला पुढच्या जन्मी अमूक अमूक व्हायला आवडेल अशा चर्चा चालू जन्माविषयी काहीही माहित नसताना झडतात. पुढचा जन्म डुक्कराचा झाला तर बरं. चिखलात लोळता येईल. लोक माझ्या मटणावर ताव मारतील वगैरे वगैरे. पण डास? मला पुढच्या जन्मी डास व्हायचंय. छान उडत उडत लोकांच्या कानाशी गुणगुण करत फिरायचंय असं म्हटलेलं ऐकलंय का कधी? असा एखादा षट्पाद किटक अस्तित्वात का आहे? आणि यापेक्षाही थेट अस्मितेलाच आव्हान देणारा प्रश्न म्हणजे अशा निरुपयोगी जीवाबरोबर मी जगत आहे???? बापरे!

असो, याशिवायही काही प्रश्न आहेत. त्याची मोकळेपणाने (निष्फळ नव्हे) चर्चा व्हावी अशी प्रामाणिक इच्छा आहे.
डास हा सजीव आणि शब्द कसा पैदा झाला
डासाने आत्तापर्यंत गाजवलेले पराक्रम (उदा. कुत्रा वफादार असतो. एक थोर व्यक्तीमत्व पंचत्वात विलीन झाल्यानंतर त्याच्या कुत्र्याने चितेत उडी मारली, स्मारक वगैरे वगैरे. डासाने असं काही केल्याचं ऐकिवात आहे का?)
डासांची पैदास करणं कितपत नफादायी आहे? ( वाघाचा सर्कशीत वापर होऊ शकतो. डास आगीच्या रिंगमधून उडत जातो किंवा त्याच्या सोंडेवर बॉल फिरवतो अशा जाहिराती किती लोकांना आकर्षित करेल? किंवा एमूची शेती केली जाते, कुक्कुटपालन होतं तसं मच्छरालय असू शकतं का?)
एका रात्रीत एक डास किती जणांना हैराण करू शकतो?
शत्रूंवर हल्ला करणारं प्रभावी क्षेपणास्त्र म्हणून डासाचा वापर होऊ शकतो का?

या प्रश्नांची थो. उ. द्या.

2 comments:

  1. mazya mate ya saglya goshtincha anubhav prashna vicharnaryane swatach ghyawa......ani uuttar milalyawar te post karav........mhnje tycha fayda saglyana hoil.
    karan dusryanchya kalpanashaktitun milnarya uttaranpeksha swanubhav kevahi uttam...........

    ReplyDelete
  2. Anna Sakhlitil kahi ghatakanni Anna Hajarensah uposhanat sahabhagi honyacha nirnay ghetlyas samasta manushyajat tyanna dhanywaad deil, tyapaikich ek mhanje daas. Ab tak chappan cinema pahilyawar asmadikanni dasancha encounter karnari racket vikat ghetali. pun ajkal rackethi banavat encounter karu lagli ahe.

    ReplyDelete