Thursday, April 14, 2011

ढवळाढवळ

गरम पाण्यात एक चमचा साखर घाला आणि विरघळेपर्यंत ढवळा.
त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर घाला आणि पुन्हा ढवळा
अर्धा कप दूध घाला आणि चहासारखा रंग येई पर्यंत ढवळत रहा. चहा तयार
ही तमाम ढवळाढवळ चहा नामक उत्तेजक पेयासाठी आहे. चमच्याच्या आडव्यातिडव्या फिरण्याने काहीतरी प्रॉडक्टिव्ह होत असतं म्हणून ढवळाढवळीचा हा सगळा खटाटोप खपवून घेतला जातो. खाण्यापिण्याच्या संदर्भात हे होणं साहजिकच आहे हो. पण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न, नव्हे कटच म्हणावा, कुणी करत असेल तर त्याला काय उत्तर आहे?
काहीही कारण नसताना निव्वळ फालतू गोष्टींसाठी दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा चावटपणा करायला लोक का उत्सुक असतात देवच जाणे. एकप्रकारचं आत्मिक सुख मिळतं कुरापती काढताना. दुस-याच्या दुःखात आनंद शोधत दात विचकत उजळ माथ्याने फिरत असतात हे जीव. "अरेरे हे कसं काय झालं?" या प्रश्नात काळजी कमी आणि भोचकपणाच जास्त. सांगितलंय कुणी नाही तिथे नाक खुपसायला? स्वतःच्या भानगडी निस्तरताना नाकी नऊ येतात इथे तर दुस-यांच्या भांड्यात चमचा घालून चव चाखायची खोड करायची अक्कल कशी काय येते? एकतर आपल्याच भानगडी समजेपर्यंत उशीर झालेला असतो इथे. दुस-यांच्या पांघरूणात घुसायचंच कशाला?
अगं बाई कसं केलं बघा त्याने. कसं होणार त्याच्या घरच्यांचं. आपण जाऊन समजावलं पाहिजे त्याला.
अहो काकू खाल्ली मी माती. खातात काही लोक. छंद असतो तो त्यांचा. दात खराब होतात त्याने वगैरे गोष्टी माहित्येय. बरं, मी माती खाल्ली म्हणून जगाच्या नकाशावरच्या जमिनीच्या एकूण भूभागामध्ये काही फरक पडलाय का? तुमचं घर खचलंय का? ओट्याला तडा गेलाय का? तुमच्या कामवाल्या बाईंनी बहिष्कार घातलाय का तुमच्या घरावर? काय प्रॉब्लेम आहे तुमचा?
चमचा कुणाचा, भांड कुणाचं, पदार्थ कोणताय, खाणारेय कोण, ताट कुठे आहे याचा पत्ता नसताना गॅस पेटवण्यात काय अर्थ आहे?

1 comment:

  1. mala hya post madhli shevatchi line atishay aavadli... dhamal!! :P

    ReplyDelete