Tuesday, April 26, 2011

मद्यांदोलन

(हा विषय खूप गहन आहे. लेखकाच्या विचारधारेशी वाचक सहमत होतीलच याची शाश्वती नाही. स्व-जबाबदारीवर वाचावा.)
इतिहासात अनेक मोठमोठी आंदोलनं झाली. म्हणजे तेव्हा वास्तवात घडली आणि त्यानंतर पुस्तकात घडत होती म्हणून आम्हाला कळली. अशी एखादी चळवळ, रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट, कँडल मार्च, उपोषण, पोलिसांची लाठी खाणं (हे जरा फारच होतंय. असो) अनुभवलं पाहिजे प्रत्येकाने. आपापल्या परीने एखाद्यातरी गोष्टीचा विरोध केलाच पाहिजे. समाजाच्या दृष्टीने ती गोष्ट कितीही क्षुल्लक, अर्थहीन, “वजा ट” दर्जाची असली तरी लोकलज्जा बाळगू नये. आंदोलनं करण्यासाठी इश्यूपेक्षा ईर्षा महत्त्वाची असते. चळवळींसाठी नैतिक मूल्यांपेक्षा मानसिक, शारीरिक अस्वस्था असावी लागते. उपोषणासाठीही तसंच काहीतरी. सध्या आंदोलनं, उपोषण, चळवळीचं वातावरण आहे. पुरस्कार वापसी, असहिष्णु वातावरण असल्याचीही मोठी चर्चा आहे. त्यामुळे वाहत्या गंगेत आपणही हात धुवून घ्यावेत. 
पण आमचा इश्यू जरा वेगळा आहे. गांभीर्य असलं तरी त्यात नैतिकता नाही असा आरोप होत असल्यामुळे आंदोलनाचा झेंडा इथेच फडकवला जात आहे. महागाईच्याविरोधातलं हे बंड आहे. भाज्या, जीवनावश्यक वस्तूंचे दर थेट स्वर्गातल्या अप्सरांना जाऊन भिडलेत. डाळींना तर हिरे-मोत्यांएवढी किंमत आली आहे. त्यातलीच एक तार धरून आम्ही पहिल्या धारेचं आंदोलन छेडत आहोत. 
मागे दारूच्या किंमतीत वाढ झाली म्हणून आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय घेताच क्षणी काही समाजकंटकांकडून आमच्यावर चकणा फेकण्यात आला होता. पण त्याची आम्हाला चिंता नाही. एका क्वार्टरमागे दहा-वीस नव्हे तर थेट सत्तर रूपये वाढवणे म्हणजे नशेतल्या माणसाला अघोरी प्रकारांनी शुद्धीत आणण्यासारखे आहे हो. एकतर सुखी राहण्यासाठी पैसे कमी पडत असतात हे दुःख व्यक्त करण्यासाठी बाटलीला जवळ करावी तर तीसुद्धा आवाक्याबाहेर जायच्या गोष्टी करायला लागली. याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. खिडकीत, तसंच खाली इमारतीच्या एण्ट्रन्सला निषेधाचे होर्डिंग्ज लावण्यात आले. 
पण आता मात्र असहिष्णुतेची हद्दच झाली. दारूवर थेट बंदीचा घालण्याचा निर्णय घेण्याचा विचार सध्या सुरू आहे. हा विचार भीषण आहे. या विचारामागे सुप्त हिंसा दडलेली आहे. मनातल्या कोंडमा-याला वाट करून देणारी ही बाटलीच जरा का कुणी हिरावून घेतली तर येत्या काळात आम्ही पामरांचा मानसिक संतुलनाचा डोलाराच कोसळेल. आणि त्याचीच परिणती अराजकामध्ये होईल. त्यामुळेच याचा सारासार विचार व्हावा आणि संपूर्ण दारूबंदी ऐवजी काही पर्यायावर चर्चा व्हावी. हे जो पर्यंत होणार नाही तो पर्यंत हे मद्यांदोलन सुरूच राहील.
असो. आंदोलनाला काही पाश्वर्भूमी असते. प्रमुख मागण्या आणि काही कारणं असतात. काही प्रमुख मागण्या येथे मांडण्यात येत आहेत. त्याचा विचार शिफारस समितीने करावा.
१. दारूवरील अतिरिक्त सेवा कर त्वरीत कमी करण्यात यावा.
२. शेतकरी, अत्यल्प उत्पन्न गट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच मद्यार्थ्यांसाठी काही खास सोयी-सुविधा आणि विशेष योजना राबवल्या जाव्यात. उदा. बस, ट्रेनमध्ये राखीव कम्पार्टमेण्ट किंवा जागा असाव्यात. संसदेत १/७ आरक्षण असावे.
३. काही ठराविक मद्यांवर सरकारने सबसिडी द्यावी.
४. मद्याच्या प्याल्याला प्रथमच ओठ लावणा-यांसाठी खास शिष्यवृत्ती देण्यात यावी.
५. अ. परदेशी मद्यांच्या आयातींमुळे देशी दारूंवर अतिक्रमण होऊन इथल्या मूळ मद्योजकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळेच सरकारने स्व’देशी’चा आग्रह धरावा.
ब. मेक्सिको देशाने त्यांचे टकिला हे देशी पेय जगाच्या कानाकोप-यात नेऊन पोचवलं आहे. त्याच पद्धतीने सरकारने ताडी, संत्रासारख्या प्रकारांना प्रोत्साहन द्यावे.
६. दारूच्या गुत्त्यांसाठी वाढीव एफएसआय देण्यात यावा. घरगुती दारू निर्मितीला लघु-उद्योगाचा दर्जा देऊन त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी.
७. मद्याचं अतिसेवन करणा-यांवर कारवाई करावी. जेणेकरून मद्याचा साठाही कायम राहील आणि अतिसेवनामुळे आरोग्याला होणारे अपायही टळतील.
टीप - या व्यतिरिक्त आपल्या काही मागण्या असतील तर त्वरीत संपर्क साधावा
या मागण्या पूर्ण होईपर्यंत..........
वाचकांच्या सोयीसाठी दारूची काही माफक माहिती देत आहोत.

दारूसर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक प्रमाणात असते. यात अनेक प्रकार आहेत. देशी दारू आणि घरगुती किंवा हातभट्टीची दारू- जास्त प्रमाणात घेतली जाते.वाईन्स - यापैकी घरगुती वाईन ही कमी मद्यार्क असल्यामुळे (म्हणजे 5-10 टक्केपर्यंत) इतर दारूप्रमाणे तिचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत. घरगुती वाईन द्राक्षे, मोहाची फुले, तांदूळ, गूळ, काकवी, काजू, इ. कोणत्याही गोडसर वस्तूपासून तयार केली जाते. वाईन हा प्रकार मुरवलेल्या पदार्थापासून बनवतात. त्यात पाणी व इतर पदार्थही असतात म्हणून मद्यार्काचे प्रमाण सौम्य असते. आपल्याकडे अनेक आदिवासी समाजांमध्ये अजूनही वाईन्स लोकप्रिय आहेत आणि त्यांना स्थानिक नावे आहेत.

जास्त मद्यार्काचे प्रकारदारूचे इतर प्रकार हे बाष्पीभवन करून (यालाच 'गाळणे' असे म्हणतात) तयार करतात. त्यात मद्यार्क जास्त असते. देशी दारूत 40-50% मद्यार्क असतो. अर्थात ही 'कडक' दारू असते. हातभट्टीची दारूही यासारखीच कडक असते पण त्यात 'किक' येण्यासाठी आणखी काही पदार्थ (नवसागर, बॅटरी सेल, इ.) असतात. देशी दारू बहुधा मळीपासून बनवतात.
इंग्लिश या नावाने ओळखली जाणारी दारू ही जास्त काटेकोरपणे बनवलेली व व्यापारी कंपन्यांची लेबले लावून येते. रम, व्हिस्की, ब्रँडी इ. प्रकार जास्त मद्यार्काचे असतात. (सुमारे 40%). या सर्व प्रकारांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे ती अंतिमत: देशी दारूप्रमाणेच घातक मानायला पाहिजे. भारतात सुमारे 21% पुरुष कमीअधिक प्रमाणात दारू घेतात असे आढळते.
वाईन्स सौम्य म्हणून कौटुंबिक पातळीवर वापरल्या जातात. त्यांचा मादक परिणाम सौम्य असतो. त्यामानाने दुष्परिणाम अल्प असतात व कमी वेळ टिकतात. मात्र जास्त मद्यार्कामुळे इतर प्रकारांची सवय लागण्याची शक्यता अधिक. बाजारू दारूमुळे जास्त व्यापक सामाजिक दुष्परिणाम होतात. तरीही आपल्या देशात कोणतीही दारू (वाईन असो किंवा नसो) घातक आहे असे मानले जाते. काही सामाजिक कार्यकर्ते सौम्य व कडक असा भेद न करता पूर्ण दारूबंदीची भूमिका घेतात.जागतिक आरोग्य संघटनेने मात्र सौम्य मद्यार्काचा शरीराला काही प्रमाणात औषधी उपयोग होतो अशी भूमिका घेतलेली आहे.
- मेंदूवर त्याचा शामक (थंडावणारा) परिणाम होतो आणि सुरुवातीस विचार संथावणे, तरंगणे, हलके वाटणे, इ. परिणाम जाणवतो. ब-याच लोकांना एवढाच परिणाम अपेक्षित असतो आणि इथे ते थांबूही शकतात.

दारूचे शारीरिक परिणाम- अल्प प्रमाणात घेतल्यास मद्यार्क हे भूक वाढवणारे, उब आणणारे, छाती साफ करणारे, रक्तवाहिन्या सैलावणारे रसायन आहे. माणसाला झोपेत 'ढकलण्यासाठी' त्याचा वापर पुरातन काळापासून झाला आहे. पोटात घेतल्यानंतर मद्यार्क जठरातून रक्तात पसरते आणि काही मिनिटांतच त्याचा परिणाम जाणवतो.
- जखमा निर्जंतूक करण्यासाठी दारू वापरण्याची पध्दत पूर्वीपासून आहे.
- पण मद्यार्क हा जातीने मादक पदार्थ आहे. (मद्य म्हणजेच मादक) त्याचे शरीराला व्यसन लागते. हळूहळू त्याच 'सुखद' परिणामांसाठी त्याचे प्रमाण वाढवावे लागते. याचा अर्थ असा की स्वतःचे किंवा इतरांचे नियंत्रण नसल्यास दारूचे हळूहळू व्यसन लागत जाते. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. पण अनेक जणांना मात्र व्यसन लागते हे लक्षात असू द्या.

No comments:

Post a Comment