Tuesday, April 19, 2011

हे वाचू नका

काही म्हणजे काहीच सुचत नाहीये. असंच नुसतीच की-बोर्डवरून बोटं फिरवतोय. यातून काही फार वाचनीय निघणार नाहीये. पण आत्ता या क्षणाला दुसरं काहीच नाहीये करण्यासारखं. समोर पिंपळाचं झाड अंधारातही मी आहे असं सांगतंय. कपडे, दप्तर (बरेच दिवसांनी वापरला हा शब्द), माउस, डास मारायची रॅकेट, पाकिट, कॅमेरा, रूमाल, पेनड्राइव्ह, कंगवा, मोबाइल, बॅटरी, चार्जर, पेन अशा काही जिन्नसांमध्ये एका सजीव प्राण्याची कळपाटावरून बोटं फिरतायंत. कुत्र्यांचं पार्श्वसंगीत तालात सुरू आहे.
कुत्र्यांवरून आठवलं, डासाप्रमाणेच या प्राण्याचंही काहीतरी केलं पाहिजे. काम-धंदा नसला की नुसते भुंकत बसतात. कुत्र्यांनी म्हणे भूतं दिसतात. त्यांची व्हिजन रेंज चिक्कार असते अशी माहिती एका थोर मित्राने पुरवलीये. पण भूतं दिसली म्हणून घाबरायचं कशाला. आणि च्यायला कुत्राच घाबरायला लागला की उद्या साखळीला बांधायचं कुणाला? भूताला?
Predator 2 नावाचा एक अशक्य सिनेमा नुकताच डोळ्यांमध्ये भरलाय. त्याचं रवंथ सुरू आहे. म्हणजे असा एखादा बायो-टेक्नो-फिजिओ-केमिकल जीव गोकुळवर चहा पिताना आढळला तर समस्त पार्लेकरांना सांस्कृतिक धक्काच बसेल. पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेमध्ये काही कार्टी तसा पोशाख वगैरे करून पेपरात फोटो छापून आणतील. फडकेंकडे पेढे विकत घेऊन पार्लेश्वराचं दर्शन घ्यायला हा बा-टे-फि-के जीव रांगेत उभा राहिला तर? किंवा चौकातल्या दहीहंडीमध्ये सगळ्यात वरच्या थरावर हे काका कसे दिसतील असे काही क्रिएटिव्ह विचार सुरू आहेत.
बाकी या हॉलिवूडवाल्यांच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. परवा रात्री उगीचच The Grudge नावाचा एक तद्दन बोर पण ब-यापैकी फाडू सिनेमा बघितला. रद्दड याच्यासाठी की भूत दाखवण्यासाठी उगीचच मध्येच भो किंवा नुसतंच ऑ असे आवाज सुरू होते. असो. पुरे.
काल रात्री साडेदहाला झोपलो. पावणेतीनला अचानक जाग आली. तो ग्रज नामक सिनेमा आठवून फाटली. ग्लुकॉन-डी बनवून प्यायलो. मोबाइलवर गाणी ऐकत झोपण्याचा प्रयत्न केला पण फसला. पुन्हा उठलो आणि सरळ लॅपटॉप सुरू केला. (ज्याने कुणी लॅपटॉप शोधून काढला त्याला माझ्या तर्फे बाबूचा वडापाव फुकट, चटणीसकट) थोडावेळ इकडेतिकडे क्लिक करून मग ४ वाजता डोळे मिटले. पुन्हा थोड्यावेळाने जाग आली तेव्हा उजाडलं होतं. तेव्हा जरा बरं वाटलं.
असो. कायच्या काय सुरू आहे. बोटं दुखायला लागलीत. मोडली पाहिजेत.

1 comment:

  1. "हे वाचू नका" अगदी "वाचनीय" झाले आहे !!!!

    ReplyDelete