Wednesday, April 13, 2011

बौद्धिक

काही अनोळखी माणसं कधीतरी अचानक भेटतात आणि त्यांच्याशी बोलून अगदी थकवा निघून गेल्यासारखं होतं। अनोळखी म्हणजे कुठल्यातरी मित्राच्या पार्टीत बघितलेला चेहरा असतो हो तो। फार काही मनात घर करून बसेल असं काही तेव्हा वाटतही नाही। पण नंतर मात्र अशक्य ठिकाणी अशक्य वेळी भेट झाली की जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारख्या गप्पा होतात।
इकडच्या तिकडच्या गोष्टी होत विषय निमुळता होतो आणि मग थोडासा बौद्धिकतेकडे वळतो. लोकं बौद्धिक विषयांना का घाबरतात देव जाणे. जरा कुठे कुणी फिलॉसॉफिकल शब्द उच्चारले की, "ए, च्यायला बौद्धिक घेऊ नकोस हं!" अरे हा काय चावटपणा आहे? डोकं न खाजवताही हे विषय कळू शकतात की. बौद्धिकतेला विनोदाचा स्पर्श असला की सगळं कसं झपाझप उमगत जातं. मुळात कोणताही विषय गोष्टीरूपात सांगितला ना की त्याची गंभीरताही जात नाही आणि तो अवघडही वाटत नाही. पण गोष्टी सांगण्यासाठी आधी त्या ऐकाव्या लागतात.
डोकं रिकामं असलं की दोन गोष्टी होतात। एक तर इंग्रजी म्हणी प्रमाणे Empty Mind Devil's Home बनतं. किंवा मग एरवी जड वाटणारे विषय सहज कळतात. दोन्हीमध्ये कसला जबरदस्त फरक आहे. पण हे वास्तव आहे हो. हे वाक्य जनरलाइझ करण्याच्या भानगडीत न पडणे चांगले. असो, सांगायचा मुद्दा असा की डोकं जितकं रिकामं असेल ना तितके बौद्धिक विषय कळणं सोप्पं.

No comments:

Post a Comment