Saturday, February 13, 2010

फास्ट फूड

चायनीजच्या गाडीवर जाऊन नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन बोंबलल्यामुळे चिन्मय आणि गँगच्या मूडचं खोबरं झालं होतं. बेत रद्द होण्याचं कारणही तसंच होतं. सातपैकी तीन जणांचे उपास एकाच दिवशी आल्यामुळे चायनीजची भूक पिक्चरवर भागवण्यात आली. आठवड्यातील कमीत कमी तीन दिवस कोणातरी भिडूचा उपास असतोच. कॉलेज कॅम्पसमधील अशा उपासकऱ्यांची संख्या वाढत आहे. याची कारणं बघाल तर पोटावर हात मारून घ्याल.

धामिर्कता हे तर जुनं कारण आहे. पण त्यापेक्षा परीक्षा, असाइनमेंट्स, जर्नल या सगळ्यांचे मार्क सांभाळण्यासाठी नियमित अभ्यासाऐवजी नियमित उपास करण्यावरच जास्त भर दिला जातो. मंगळवारी असणाऱ्या फिजिक्स प्रॅक्टिकल्समधे सगळे प्रयोग यशस्वी होवो अशी प्रार्थना अनेक जण गणपतीच्या साक्षीने घेतात. आणि त्यानंतर जर्नलमधील प्रयोगांच्या संख्येनुसार उपास करण्याच्या मंगळवारांची संख्या ठरते. असा अजब प्रकार रोहित सुवेर् याकट्टेकऱ्याने टीवायला असताना केला होता. उपासांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झाल्याचं त्याचं मत आहे.

अनेक मुलं शिकण्यासाठी हॉस्टेलमधे किंवा रूम शेअर बेसिसवर राहतात. चार-पाच जण मिळून खाणं बनवतात. आठवड्याचे पाच दिवस पाच जण खाणं बनवतात. कधीतरी आराम तसंच पैसे वाचवण्यासाठी उपास हा उत्तम उपाय ठरतो. हॉस्टेलच्या मेसवरील खाण्याबाबत तर न बोललेलंच बरं. त्याचा कंटाळा येऊन उपास करणारेही कॉलेजांमध्ये कमी नाहीत. मी अकोल्याला होतो तेव्हा आमच्या हॉस्टेलच्या मेसमधे दर रविवारी चिकन रश्श्याचा प्रोग्राम असायचा. आम्ही त्याच्यावर आडवा हात मारायचो. साहजिकच दुसऱ्या दिवशी पोटाची वाट लागायची. त्यामुळे आपसूकच दर सोमवारी उपास घडायचा. असं नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या प्रदीप धनावडेने सांगितलं. याशिवाय कडकीच्या जमान्यात अनेक हॉस्टेलाइट्स उपासाला प्राधान्य देतात.

काळाच्या ओघात उपासाचं स्वरूप पूर्णपणे बदललं असल्याचं पौरोहित्याचं शिक्षण घेणाऱ्या प्रसाद जोगळेकरने सांगितलं. देवाच्या जवळ राहण्यासाठी उपवास करण्यात येतो. त्या काळात सात्विक आहार घेणं अपेक्षित असतं. पण आजकाल डाएटकरताच उपास केला जातो. खरंतर सध्याच्या धावपळीच्या युगात मन:शांती आणि चांगल्या आरोग्यासाठी उपास गरजेचा असल्याचंही प्रसादने सांगितले.

उपासाच्या दिवशी सात्विक आहार घेण्याऐवजी एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ खाल्ले जातात. उपासाचे खास पदार्थ या पाटीखाली लज्जतदार खातेदारीच केली जाते. उपासाची चकली, उपासाचा चिवडा यासारख्या पदार्थांचं एवढं पेव फुटलं आहे की काही दिवसांनी उपासाचं चिकन आणि अंड आलं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. ही कोंबडी उपासाची होती त्यामुळे तिचं अंड उपासाला चालतं असं वाक्य हॉटेलमधला वेटर फेकू शकेल. असं झालं तर कट्टेकरींना प्लॅन रद्द करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे देवा, असे पदार्थ लवकरात लवकर तयार होवो. ही इच्छा पूर्ण होईपर्यंत दर बुधवारी उपास करेन.

No comments:

Post a Comment