Thursday, May 13, 2010

केटी पार्टी

कॉलेज लाइफमध्ये केटी लागणं चूकच! पण, हे नाकेवाईकांना समजावणार कोण? याविषयीचे त्यांचे सिद्धांत, विचार भन्नाट असतात. विद्यापीठाने पुरवलेल्या सर्व
सुविधांचा पुरेपूर वापर केला पाहिजे, अशी त्यांची कल्पना असते. र्फस्ट क्लास मिळवणारे अनेक जण असतात. अभ्यास केला तर तो सहज मिळतो. पण, केटी मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावे लागतात, असं तत्त्वज्ञान फॉलो करणारेही अनेक कॉलेजियन्स आहेत. कॉलेज आयुष्यात एटीकेटी लागली नाही, तर कॉलेज लाइफ आपण जगलोच नाही असा त्याचा अर्थ होत असल्याचं या 'केटीकरीं'चं म्हणणं आहे. परीक्षेच्या काळात रात्र रात्र जागून अभ्यास केला जातो. पण, प्रत्यक्ष पेपर लिहिताना भयंकर कंटाळा येत असल्याने काही उत्तरं अर्धवट सोडली जातात. कधीकधी एकच वाक्य त्यातले शब्द बदलून दोन-तीन वेळा सहज लिहिलं जातं. मग केटी लागणारच ना. पण, या एटीकेटीचं नाकेवाईकांना काहीच वाईट वाटत नाही. 'नापास होण्यात कमीपणा तो काय? अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. जगभरात जे मोठ-मोठे विद्वान लोक होऊन गेले, त्यांच्यापैकी ड्रॉप-आऊट बाय चॉइसच जास्त होते. त्यामुळे आमच्या केटी लागण्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही,' असं एका कट्टेकरीचं मत आहे. अनेक जण तर एखाद्या विषयामध्ये मुद्दाम ठरवून केटी घेतात. केवळ मजा म्हणून त्या विषयामध्ये नापास होण्याची दुर्दम्य इच्छा बाळगून असतात. सोप्यातल्या सोप्या विषयामध्ये जाणूनबुजून केटी घेणारेही अनेक आहेत. एका हुश्शार मुलाने तर आपली आई जो विषय कॉलेजमध्ये शिकवते त्याच विषयामध्ये मुद्दाम नापास व्हायचं ठरवलं आणि तसं केलंही! शेवटच्या वर्षाला तो र्फस्टक्लासने पास झाला ही गोष्ट निराळी. पण, हे असं खुळ डोक्यात ठेवून अनेक विद्याथीर् निधोर्कपणे केटी लावून घेतात. यासाठी परीक्षेच्या वेळी कोण सर्वात आधी पेपर देणार यासाठी स्पर्धा लागलेली असते. उत्तरपत्रिकेत अगदी एकच वाक्य लिहूनही काही विद्याथीर् वर्गाच्या बाहेर पडतात आणि पेपर संपेपर्यंत हक्काच्या ठिकाणी फाक्या मारतात. नापास होऊन एक वर्ष घरी बसणं आणि एटीकेटी लागणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचं केटीकरींचं म्हणणं आहे. ड्रॉप लागणं म्हणजे थोडं धोकादायक आहे. एटीकेटी लागल्यावर वर्ष फुकट नाही. त्यामुळे तेवढा धोका नसतो. केटी लागल्यावर वाईट वाटण्यापेक्षा त्याचं सेलिब्रेशनच केलं जातं. मार्कशीटवर एटीकेटी ही चार अक्षरं बघितली, की आनंद गगनात मावेनासा होतो. जास्तीत जास्त केटी लागणारा शूरवीर पाटीर् देण्याचा मानकरी ठरतो. ड्रॉप न लागता केटी लागल्याबद्दल मग वैचारिक, बौद्धिक चर्चा झाडल्या जातात. विद्यापीठाने दिलेल्या सुविधांचा पुरेपूर वापर करणं वगैरे गोष्टी ठीक आहेत राव. पण, यासाठी मुद्दाम एटीकेटी लावून घेणं हा वेडेपणाच आहे. अभ्यास करुन सरळ व्यवस्थित पास होणं हे सामान्यपणाचं लक्षण आहे. स्वत: असामान्य, हुशार असल्याचं सिद्ध करण्यासाठी हे असले प्रकार करायची गरज आहे का? विनंती विशेष - र्फस्ट क्लास, डिस्टिंक्शन, गोल्ड मेडल, स्कॉलरशिप यासारख्या सुविधाही विद्यापीठानेच तयार केल्या आहेत. तेव्हा त्यांचाही विचार कट्टेकरींनी करावा. एटीकेटी असणाऱ्यांच्या खास कम्युनिटीज ऑर्कुट, फेसबुकसारख्या वेबसाइटवर आहेत. त्याचे फॅन्सही अनेक आहेत. इथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या जातात. एटीकेटी या शब्दाचे फुल फॉर्मही तिथे देण्यात येतात. अलाऊड टू कीप टर्म ( हा खरा फुलफॉर्म आहे.) ऑल टाइम कीप ट्रायिंग अलाउ टू कीप टेक्स्टबुक आज थोडा कल थोडा

Saturday, February 13, 2010

फास्ट फूड

चायनीजच्या गाडीवर जाऊन नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन बोंबलल्यामुळे चिन्मय आणि गँगच्या मूडचं खोबरं झालं होतं. बेत रद्द होण्याचं कारणही तसंच होतं. सातपैकी तीन जणांचे उपास एकाच दिवशी आल्यामुळे चायनीजची भूक पिक्चरवर भागवण्यात आली. आठवड्यातील कमीत कमी तीन दिवस कोणातरी भिडूचा उपास असतोच. कॉलेज कॅम्पसमधील अशा उपासकऱ्यांची संख्या वाढत आहे. याची कारणं बघाल तर पोटावर हात मारून घ्याल.

धामिर्कता हे तर जुनं कारण आहे. पण त्यापेक्षा परीक्षा, असाइनमेंट्स, जर्नल या सगळ्यांचे मार्क सांभाळण्यासाठी नियमित अभ्यासाऐवजी नियमित उपास करण्यावरच जास्त भर दिला जातो. मंगळवारी असणाऱ्या फिजिक्स प्रॅक्टिकल्समधे सगळे प्रयोग यशस्वी होवो अशी प्रार्थना अनेक जण गणपतीच्या साक्षीने घेतात. आणि त्यानंतर जर्नलमधील प्रयोगांच्या संख्येनुसार उपास करण्याच्या मंगळवारांची संख्या ठरते. असा अजब प्रकार रोहित सुवेर् याकट्टेकऱ्याने टीवायला असताना केला होता. उपासांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झाल्याचं त्याचं मत आहे.

अनेक मुलं शिकण्यासाठी हॉस्टेलमधे किंवा रूम शेअर बेसिसवर राहतात. चार-पाच जण मिळून खाणं बनवतात. आठवड्याचे पाच दिवस पाच जण खाणं बनवतात. कधीतरी आराम तसंच पैसे वाचवण्यासाठी उपास हा उत्तम उपाय ठरतो. हॉस्टेलच्या मेसवरील खाण्याबाबत तर न बोललेलंच बरं. त्याचा कंटाळा येऊन उपास करणारेही कॉलेजांमध्ये कमी नाहीत. मी अकोल्याला होतो तेव्हा आमच्या हॉस्टेलच्या मेसमधे दर रविवारी चिकन रश्श्याचा प्रोग्राम असायचा. आम्ही त्याच्यावर आडवा हात मारायचो. साहजिकच दुसऱ्या दिवशी पोटाची वाट लागायची. त्यामुळे आपसूकच दर सोमवारी उपास घडायचा. असं नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या प्रदीप धनावडेने सांगितलं. याशिवाय कडकीच्या जमान्यात अनेक हॉस्टेलाइट्स उपासाला प्राधान्य देतात.

काळाच्या ओघात उपासाचं स्वरूप पूर्णपणे बदललं असल्याचं पौरोहित्याचं शिक्षण घेणाऱ्या प्रसाद जोगळेकरने सांगितलं. देवाच्या जवळ राहण्यासाठी उपवास करण्यात येतो. त्या काळात सात्विक आहार घेणं अपेक्षित असतं. पण आजकाल डाएटकरताच उपास केला जातो. खरंतर सध्याच्या धावपळीच्या युगात मन:शांती आणि चांगल्या आरोग्यासाठी उपास गरजेचा असल्याचंही प्रसादने सांगितले.

उपासाच्या दिवशी सात्विक आहार घेण्याऐवजी एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ खाल्ले जातात. उपासाचे खास पदार्थ या पाटीखाली लज्जतदार खातेदारीच केली जाते. उपासाची चकली, उपासाचा चिवडा यासारख्या पदार्थांचं एवढं पेव फुटलं आहे की काही दिवसांनी उपासाचं चिकन आणि अंड आलं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. ही कोंबडी उपासाची होती त्यामुळे तिचं अंड उपासाला चालतं असं वाक्य हॉटेलमधला वेटर फेकू शकेल. असं झालं तर कट्टेकरींना प्लॅन रद्द करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे देवा, असे पदार्थ लवकरात लवकर तयार होवो. ही इच्छा पूर्ण होईपर्यंत दर बुधवारी उपास करेन.

.............

Sometimes just thinking out of the box is what it takes!

ए फॉर आकडा......

भाषेला थोडा आचरटपणा आणि थोड्या मस्तीसोबत तरुणाईचा बिनधास्त टच दिला तर त्यातून कट्ट्यावरच्या एका वेगळ्याचशब्ददुनियेची सफर होते. ही दुनिया कॉलेजविश्वासारखीच चटपटीत, खमंग आणि तितकीच अर्थपूर्णही.
........

अबब केवढं हे शब्दांचं जग
जणू मोठमोठाले आकाशातले ढग
कधी करतात कठोर वाणी
तर कधी नकळत बरसतात पाणी

असाइनमेण्ट, प्रेझेण्टेशन्स, जर्नल्स, परीक्षा या सगळ्यांमध्ये कुणी प्रामाणिकपणे साथ देत असेल तर ते म्हणजे फक्त शब्द. प्रयोगवह्यांपासून ते उत्तरपत्रिकांपर्यंत सगळीकडे पानं भरण्यासाठी या आपल्या सवंगड्याइतकं दुसरं कुणीच जवळचं नसावं. पण या शब्दांचा अर्थ स्थळानुरुप बदलतो हे ही तितकंच खरं! म्हणजे उत्तरपत्रिकेतले, नेहमीच्या लेक्चरमधले किंवा संभाषणातले शब्द, कॉलेजियन्सच्या अड्ड्यांवर घुमायला लागले की त्यांच्यातून काही वेगळेच अर्थ निघतात, अगदी कल्पनेपलीकडचे. या शब्दांचे अर्थ शोधले तर, एक अख्खी नवीन डिक्शनरी तयार होऊ शकते. कॉलेजगोअर्सच्या कट्ट्या-अड्ड्यांवरच्या शब्दांवर पीएचडी नक्कीच होऊ शकेल.

अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमधे भलेही केटी असेल, पण अड्डा वाङ्मयात मात्र डिस्टिंक्शन ठरलेलं. या भाषेचे वर्ग भरण्याचं ठिकाण म्हणजे कट्टा किंवा अड्डा आणि त्याचे पाणिनी म्हणजे आपले कट्टेकरी. हे भाषाकार लई भन्नाट असतात. अभ्यासक्रमातील शोध माहीत नसले, तरी नवीन शब्द शोधून भाषेच्या वाढीला प्रामाणिकपणे हातभार लावत असतात.

कट्ट्यावरचे चेहरे जसे बदलत जातात, तसे या शब्दांचे मोहरेसुद्धा. शब्द बरेचदा तेच असतात. पण त्यांचा अर्थ मात्र मूळ अर्थापासून काही प्रकाशवर्षं एवढा लांब असतो. तर, कधी तो उच्चारण्याच्या पद्धतीमधे खूप फरक असतो. कट्टेकरी प्रकाशनच्या डिक्शनरीतील हे शब्द इतरत्र कुठेही ऐकायला मिळणार नाहीत
.......................

कट्टेकरी प्रकाशन शब्दकोश

मुलींचे शब्द :
पकाव, बकवास, ओ शिट, टुकार, थुकरट, फटँग, अय्या (हा शब्द अजूनही पॉप्युलर आहे) गेट अ लाइफ (काही काय?) स्टुपिड चिक (वेडसर मुलगी), थिंगी (थिंग), फाल्तूगिरी, झेंडू, फाकडू
डोक्याला शॉट, फ्रिक, तीन फुल्या तीन बदाम (मुलाने मुलीच्या मागे लागणे)याशिवाय ग्रुपमधे मुलं जे शब्द वापरतात ते मुलीसुद्धा सर्रास वापरतात.

मुलांचे शब्द :
फण्डू - झक्कास
बाप, एक नंबर, दंगा, रापचिक, फट्टे, डेंजर, भारी - सॉल्लिड
फटाका, आकडा - सॉल्लिडच्या पुढची एक पायरी
रँचो - स्टायलिश मुलगा
सूर्या बल्ब, उजाला - खूप गोरा
झोल, राडा, लोचा - अडचणी
डोक्याला शॉट, वैतागवाडी - वैतागणे
सवाल - प्रश्नच नाही
तमाम, सुसाट, कंडा - भयंकर
सुतरफेणी - पांढरे केस
प्रकाशकाका - टक्कल
चिवड्यात लाडू - अर्धवर्तुळाकार टक्कल
८० पर्सेंट डिस्काऊण्ट - फेकाड्या
स्वर्ग दोन बोटे - खूप उंच मुलगा किंवा मुलगी
उदबत्ती - एकदम बारीक
धृतराष्ट्र, धनुक्षबाण - सिगरेट
टॉनिक - दारु
पेन्सिल खोडरबर - खूप उंच आणि खूप बुटका
बुंदीचा लाडू - खूप पिंपल्स असणारा/री
फोडला - खूप छान कामगिरी करणे
कबुत्रं (कबुतरं नाही)- कपल्स
झंडूर, झोण्या - फालतू
ज्याप्रमाणे कट्टेकरींचा स्वतंत्र शब्दकोश आहे, तसाच कोश प्रोफेसर्सकडे तयार आहे. या कोशाची माहितीही लवकरच तुमच्यापुढे आणण्यासाठी भाषासेवक तत्पर आहेत. तोपर्यंत तुमच्याकडे काही मौलिक ज्ञान असेल तर त्याची देवाणघेवाण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे.