Saturday, July 18, 2009

टॅम्प्लीज

बालपण म्हटलं की आठवतं? डबा ऐसपैस, लगोरी, लपाछपी, लंगडी... आणि बरेच खेळ. खेळणं म्हणजेच बालपण. पण, आता हे खेळ डावातून बाद झालेत. सध्या कम्प्युटर गेम्सवर खेळातला 'डॅन' आलाय. आणि यात आपल्या आठवणीतल्या जुन्या खेळांचा 'टॅमप्लीज'ही बराच मोठा आहे. कदाचित खेळात कधीच न परतण्याइतका मोठा. शट् यार... उगीच मोठे झालो! ' जास्तीची मेजॉर्टी! कमीची मेजॉर्टी! ए तुझ्यावर डॅन!'... हा गलका ऐकला आणि पटकन खिडकीत गेलो. खाली दहा-बारा मुलं लपाछपी खेळण्यासाठी सुटवत होती. 'ए मी हात असा ठेवला होता. माझ्यावर डॅन नाहीए. मी नाही घेणार डॅन!' बघून मजा वाटली आणि एकदम लहानपण आठवलं. शाळेत दिलेला गृहपाठ कसातरी उरकून खाली उतरायचं आणि हाका मारून सगळ्यांना बोलवायचं. एक-एक करत पहिली काही मिनिटं सगळे जमण्यातच जायची. त्यानंतर अर्धा-पाऊण तास काय खेळायचं यावर चर्चा कम भांडण! खेळ ठरला की लिंबू टिंबू ठरवण्यात आणखी थोडा वेळ जायचा. मग सुटवायचं. सुटवताना पुन्हा काहीतरी लोचा होऊन मग एकदाचा खेळ सुरू व्हायचा. आपल्यावर 'डॅन' आला की खूप भीती वाटायची. डॅन असणारा भिडू नेहमीच्या ठिकाणी जाऊन आकडे मोजायचा आणि पकडायला सुरुवात करायचा. तो तुडतुड्या असेल, तर बाकीचे सगळे पटापट आऊट व्हायचे. एकेकाला आऊट करून साखळी बनायची. साखळीत एकएक जण येत राहायचा. साखळी तुटू न देता इतरांना पकडताना खूप धम्माल यायची. लपाछपी आणि डबा ऐसपैस हे दोन खेळ तर काय धम्माल होते यार! लपायच्या नवीन जागा शोधताना, ती जागा दुसऱ्या कुणाला कळू न देण्याची खबरदारी घ्यावी लागायची. खेळताना कोणी चीटिंग केली, तर त्याच्यावर 'सात राज्य' किंवा प्रत्येकाकडून दहा बुक्के ठरलेले. डॅन असणाऱ्याचा छप्पा किंवा थप्पा करणारा थोडा वेळ हवेत असायचा. छप्पा आणि थप्पा किंवा धप्पा या शब्दांवरूनही भांडणं. भिडू फिरत नसला की गड्याने फेऱ्या मारायच्या किंवा लांब लांब फिरावं असं ओरडायचो. एखाद्या दिवशी कोणाला तरी ठरवून पिदवायचं. तो बिचारा रडकुंडीला यायचा. डबा ऐसपैस आणि लपाछपी 'मिस' करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डबा ऐसपैसला तोड नव्हती. सहीच खेळ होता तो. मोठ्या जागेत लगोरी, साखळी, आबाधुबी वगैरे खेळायला मजा यायची. विषामृत खेळताना अमृत मिळवण्यासाठी सगळेच जण जागा सोडायचे. हा खेळ न संपणाराच वाटायचा. लगोरी, आबाधुबीमध्ये बॉल शेकून लाल झालेल्या मांड्या आणि पाठ आठवली की आता हसू येतं. तेव्हा मात्र रडायला यायचं. लंडन लंडन स्टॅच्यू, राम-लक्ष्मण-सीता हा खेळ तर डे-केअर सेण्टरमधल्या मुलांचा सगळ्यात आवडता खेळ होता. एकदम स्टॅच्यू झालेल्या सगळ्यांना, अंगाला हात न लावता हसवायला मजा यायची. आता पाणचट वाटणारे पण तेव्हा भारी वाटणारे जोक सांगून किंवा वेडेवाकडे चेहरे करून स्टॅच्यू असणाऱ्यांना हसवायचो. पहिला जो हसेल किंवा हलेल त्याच्यावर डॅन. खांब-खांब, डोंगर का पाणी, झटापटी, डोंगराला आग लागली पळापळा, कावळा-कावळा हे खेळसुद्धा लई भारी होते. खांब-खांब, कावळा-कावळा, घर-घर या खेळांच्या नावात एक शब्द दोनदा का वापरतात, हे आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. खांब-खांबमध्ये कोणाला तरी मुद्दामहून मरवण्यात वेगळीच मजा होती. कावळा-कावळामध्ये एखाद्याला बकरा बनवण्यातला आनंद औरच होता. त्या बकऱ्याला जबरदस्त पिदवून झालं, की ठरवून दुसरा बकरा शोधायचे. त्यातल्या त्यात मोठे असणाऱ्यांची छोट्यांवर दादागिरी असायची. त्यामुळे त्या छोट्याला पिदवणं निश्चित असायचं. कांदा फोडी, कानगोष्टीयासारख्या बैठ्या खेळांनासुद्धा डिमाण्ड असायची. आंधळी कोशिंबीर खेळताना तर कितीतरी वेळा धडपडायचो. कलर कलर विच कलर, डू यू वॉण्ट? यात सांगितलेला रंग शोधण्यासाठी केलेली धडपड आठवली की हसू येतं. या सगळ्या खेळांबरोबरच असणारे, ऑप्स-बॅट्स आणि जॉली हेसुद्धा सुसाट होतं. हे खेळ नव्हते, पण तरी मजा यायची. जॉली दाखवण्यासाठी कित्येक जण हातावरच्या तिळाचा वापर करायचे. ऑप्स-बॅट्सचा असणारा ऑफ टाइम हा कितीही वेळ असायचा. मी आणि माझ्या एका मित्राने पाचवीत लावलेलं ऑप्स-बॅट्स अजूनही सुरू आहे. ते लावायची पद्धतसुद्धा वेगळीच! एकमेकांच्या हाताच्या करंगळ्या तीनदा एकमेकांना लावल्या की ते सुरू व्हायचं. पण या सगळ्या खेळांमध्ये एक गोष्ट कॉमन होती आणि ती म्हणजे 'टॅमप्लीस' (टाइमप्लीझ). हाताच्या मागच्या बाजूला जिभ लावून तो ओलसर भाग समोरच्याला दाखवून टॅमप्लीस म्हणायचो. कधीतरी दातांचे ठसेसुद्धा दाखवायचो. आणि ती थुंकी पुसली की टॅमप्लीस सुटली. सगळ्या खेळांमध्ये एकतरी चीटर असायचा आणि एकतरी पिदवण्या. खेळताना झालेली भांडणं, मारामाऱ्या काही दिवसांसाठीच असायच्या. एका टीममध्ये आल्यावर ती भांडणं विसरायला व्हायची. लंगडी-धावकीमध्ये मध्येच बदललेला पाय, लपाछपीमध्ये गुपचूप डोळे उघडून बघितलेल्या जागा. आंधळी-कोशिंबीरमध्ये पट्टीच्या खालून दिसत असूनसुद्धा न दिसण्याचं केलेलं नाटक, नवा भिडू नवं राज्य, अलाउड नसतानाही विंगमध्ये लपून बसलो होतो, हे सगळं आठवलं की पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. कम्प्युटर गेम्सच्या 'जास्तीच्या मेजॉरटी'मुळे लपाछपी, लगोरीसारख्या खेळांची 'कमी'ची कमिटी बनून, हे खेळ कधीच सुटले. कम्प्युटर गेमवर सध्या 'डॅन' आहे. सोसायट्यांमधून दहा-वीस-तीस-चाळीस क्वचित ऐकू येतं. अजूनही सोसायटीतून हाका ऐकू येतात. पण येताना 'बॉल घेऊन येरे'ऐवजी 'येताना एनएफसीची सीडी' असं ऐकू येतं. पाचवीतल्या अथर्वला लगोरीचे नियम माहीत नाहीत, पण काऊण्टर स्ट्राइकच्या हॉटकीज तोंडपाठ आहेत. बऱ्याच दिवसांनी 'जास्तीची मेजॉटीर्' ऐकून आदित्यला फोन केला 'खाली येतोस का रे!' तो म्हणाला, 'वेडा, झालायंस का तू? लपाछपी खेळायला लहान आहोत काय?' आयुष्य रिवाइण्ड करता आलं असतं तर!

No comments:

Post a Comment